अजित आगरकर विंडीजला जाणार

अजित आगरकर विंडीजला जाणार
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीसीसीआयने अजित आगरकर यांना काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. अशात आगामी वन-डे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी आगरकरांच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करण्याच्या हेतूने आगरकर वेस्ट इंडिजला जाण्याच्या तयारीत आहेत. या तिघांच्या बैठकीतून आगामी वर्ल्डकप स्पर्धेचा रोडमॅप तयार होणार आहे.

यावर्षीचा वन-डे विश्वचषक भारतात खेलला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या विश्वचषकाला विलक्षण बनवण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. मात्र, भारतीय खेळाडू आणि एकंदरीत संघाचे प्रदर्शन महत्त्वाचे राहणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वन-डे विश्वचषक सुरू होणार असून, भारताला विश्वचषकातील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना अहमदाबादमध्ये पार पडेल.

बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती मिळाली की, कसोटी मालिका संपल्यानंतर अजित आगरकर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची भेट घेतील. अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संघ व्यवस्थापनाची वैयक्तिक एकही भेट झालेली नाही. अशात ही भेट महत्त्वाची ठरू शकते. वन-डे विश्वचषकात भारतीय संघाची रणनीती काय असेल, याविषयी बैठकीत महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. खेळाडूंची फिटनेस, सतत क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंना येणार्‍या अडचणी यावरही चर्चा होऊ शकते. सोबत विश्वचषकाच्या द़ृष्टीने ज्या 20 खेळाडूंचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे, त्यावरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर या महत्त्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन हादेखील चर्चेचा विषय असेल.

जसप्रीत बुमराह आगामी आयर्लंड दौर्‍यातून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता द्रविड, राहुल आणि आगरकर यांच्यातील चर्चेनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त आयर्लंड दौर्‍यावर राहुल द्रविडऐवजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाणार, असेही बोलले जात आहे. येत्या काळात याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news