सिलेसिया (पोलंड); वृत्तसंस्था : भारताच्या अविनाश साबळे याला 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळाली आहे. पोलंडमध्ये सुरू असलेल्या सिलेसिया डायमंड लीगमध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत अविनाशला सहावा क्रमांक मिळाला. त्याला पदक मिळाले नसले तरी त्याची ही कामगिरी ऑलिम्पिकचे दरवाजे उघडण्यासाठी पुरेशी ठरली.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने 8 मिनिटे 11.63 सेकंद अशी वेळ नोंदवली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 8 मिनिटे 15 सेकंद ही पात्रता वेळ होती. अविनाशने यापूर्वीच शर्यत संपवल्याने तो पात्र ठरला. 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत होणार्या स्पर्धेतील वेळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.