आयर्लंड दौर्‍यात द्रविडऐवजी लक्ष्मण प्रशिक्षक? | पुढारी

आयर्लंड दौर्‍यात द्रविडऐवजी लक्ष्मण प्रशिक्षक?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी आयर्लंडला जाणार आहे. या दौर्‍यात बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, तर श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाल्याच्या बातम्या येत आहेत. या दौर्‍यासंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर सुट्टी देण्यात येणार आहे.

आयर्लंडमध्ये संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर असणार आहे. सितांशु कोटक आणि हृषीकेश कानिटकर यांच्यासोबत ते प्रशिक्षक संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे, तर ट्रॉय कुली आणि साईराज बहुतुले हे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. द्रविड आणि त्यांच्या कोचिंग स्टाफमधील इतर सदस्य ऑगस्टमध्ये मायदेशी परततील, जिथे शेवटचे दोन टी-20 खेळले जातील, असे क्रिकबझने वृत्त दिले आहे. द्रविड व्यतिरिक्त, स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा समावेश आहे.

उर्वरित प्रशिक्षक कर्मचार्‍यांचे मुख्य कारण म्हणजे 31 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशिया चषकापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसह व्यस्त वेळापत्रक असेल. हे विश्वचषकापर्यंत कायम राहणार आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणने यापूर्वी काही टी-20 सामन्यांसाठी गेल्या जूनमध्ये आयर्लंडचा दौरा केला, तेव्हा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. यावेळी आयर्लंडमध्ये 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी डब्लिन येथे तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. आयर्लंड मालिकेसाठी संघ अद्याप निश्चित झालेला नसला तरी हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा आहे.

अजित आगरकर यांच्या द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर टीम इंडियाची निवड होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे नवे अध्यक्ष लवकरच वेस्ट इंडिजमध्ये संघात सामील होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे सदस्य सलील अंकोला हे आधीच संघासोबत प्रवास करत आहेत. डॉमिनिकामधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ सोमवारी दुसर्‍या कसोटी सामन्याचे ठिकाण असलेल्या त्रिनिदादला रवाना झाला.

Back to top button