मँचेस्टर, वृत्तसंस्था : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs England) यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 19 जुलै रोजी खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधी इंग्लंडने त्यांच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जेम्स अँडरसनला संघात परत बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी तिसर्या कसोटीत खराब कामगिरी करणार्या ओली रॉबिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अँडरसनकडे प्रचंड अनुभव आहे, जो इंग्लंड संघासाठी उपयोगी पडू शकतो. अँडरसनने आतापर्यंत कसोटी सामन्यात 686 विकेटस् घेतल्या आहेत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे. सलामीसाठी त्याने बेन डकेट आणि जॅक क्रॉलीवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी मोईन अली तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज जो रूटकडून इंग्लंडला पुन्हा चांगल्या कामगिरीची आशा असेल.
इंग्लंडकडे आता वेगवान गोलंदाजी आक्रमण जास्त आहे. ज्यात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांचा समावेश आहे. त्याचवेळी मोईन अली फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळताना दिसेल. (Australia vs England)
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग-11 : बेन डकेट, जॅक क्रॉली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स.