WTC Points Table : टीम इंडियाला थेट नंबर 2 वर पोहचण्याची संधी! | पुढारी

WTC Points Table : टीम इंडियाला थेट नंबर 2 वर पोहचण्याची संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यजमान संघाच्या तोंडचे पाणी पळवले. कॅरेबियन संघाचा पहिला डाव 150 धावांवरच संपुष्टात आला आहे. त्यानंतर पाहुण्या भारताने दमदार सुरुवात केली. कसोटीत प्रदार्पण करणारा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दिवसाअखेर नाबाद 80 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय फलंदाजांची लय पाहता ते विंडिजसमोर धावांचा डोंगर उभा करतील यात शंका नाही.

दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जात असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) हा सामना जिंकल्यास ते गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. यापूर्वी भारतीय संघ सलग दोनदा डब्ल्यूटीसीच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचला होता, पण दोन्हीवेळा संघाचे जेतेपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले. पहिल्यावेळी न्यूझीलंड तर दुस-यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. (WTC Points Table IND vs WI)

ऑस्ट्रेलिया अव्वल, इंग्लंड दुस-या स्थानी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत आणि दोन संघांनी त्यात गुणही मिळवले आहेत. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस मालिका सुरू आहे. त्या मालिकेतील तीन सामने झाले असून त्यापैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने तर एक सामना इंग्लंडने जिंकला आहे. म्हणजेच या दोन्ही संघांचे गुणांचे खाते उघडले असून गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, भारतीय संघाला गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची सुवर्णसंधी आहे. आता प्रश्न पडतो की इंग्लंडने एक सामना जिंकला आहे, मग भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर कसा पोहोचेल. याचे उत्तर असे आहे की, इंग्लंडने एखादा सामना जिंकला असेल, पण त्यांना विजयासाठी पूर्ण गुण मिळालेले नाहीत.

इंग्लंडच्या खात्यात 10 गुण

ICC च्या नियमांनुसार WTC अंतर्गत सामना जिंकण्यासाठी संघाला 12 गुण मिळतात. ॲशेस मालिकेतील तिसरी कसोटी जिंकून इंग्लंडला 12 गुण मिळायला हवेत, पण त्यांच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. याला कारण म्हणजे मालिकेतील पहिला सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना स्लो ओव्हर रेट प्रकरणी दोन-दोन गुणांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्यावर त्यांना 10 गुण मिळाले आणि दुसरा सामना जिंकल्यानंतर 12 गुण देण्यात आले, अशा स्थितीत सध्या कांगारूंचा संघ 22 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे, इंग्लंडला विजयासाठी 12 गुण मिळाले, परंतु दोन गुणांचा आधीच दंड ठोठावण्यात आल्याने त्यांच्या खात्यातून ते वजा करण्यात आले आणि त्यांना 10 गुण दिले गेले.

भारताकडे इंग्लंडला मागे टाकण्याची संधी

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यास संघाला 12 गुण मिळतील. पण त्याचवेळी त्यांना आयसीसीच्या कोणत्याही दंडाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पूर्ण 12 गुण मिळाल्यास रोहित सेना थेट दुस-यास्थानी झेप घेईल. दरम्यान, अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी 19 जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला ते पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील, मात्र ऑस्ट्रेलिया संघ जिंकला तर भारतीय संघाच्या गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Back to top button