

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तिरंदाजी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व श्रेणीत सुवर्णपदक जिंकणारा पार्थ साळुंखे हा भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 11 पदके पटकावली आहेत. भारताची ही युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
रविवारी महाराष्ट्राच्या 19 वर्षाच्या पार्थ साळुंखेने 21 वर्षांखालील पुरुष रिकर्व एकेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या आर्चरला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. पार्थ साळुंखे हा सातार्याचा आहे. रँकिंग राऊंडमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पार्थने सातव्या मानांकित सोंग इंजूनला पाच सेटपर्यंत कडवी झुंज देत 7 – 3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे पराभूत केले. साळुंखेने 10 पैकी 10 गुण मिळवणारे दोन तर 10 पैकी 9 गुण मिळवणारा एक निशाणा साधला. त्याने फायनलमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (टार्गेट बोर्डच्या एकदम मध्यभागी निशाणा साधणे) निशाणे साधत दमदार शेवट केला.
भारताला 21 वर्षांखालील महिला रिकर्व वैयक्तिक प्रकारात देखील कांस्यपदक मिळाले आहेत. भारताच्या भाजा कौरने तैवानच्या सू सीन-यू चा 7-1 (28-25, 27-27, 29-25, 30-26) असा पराभव केला. भारताने आर्चरी युवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्ण पदके, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. भारत एकूण पदक संख्येत सर्वोच्च स्थान पटकावले.