लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण सिंह यांना कोर्टाचे समन्स | पुढारी

लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण सिंह यांना कोर्टाचे समन्स

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टाने भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह आणि कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांना समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 18 जुलै रोजी ठेवली असून यावेळी बृजभूषण आणि तोमर यांना हजर राहावे लागणार आहे.

बृजभूषण यांच्यावर 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी कोर्टाने शुक्रवारी आरोपपत्राची दखल घेतली आणि बृजभूषण सिंह आणि तोमर यांना समन्स बजावले.

बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी लावलेली कलमे गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. यापैकी, आयपीसी कलम 354 मध्ये कमाल 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे आणि ते एक अजामीनपात्र कलम आहे. आयपीसीच्या कलम 354 ए अंतर्गत जास्तीत जास्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे आणि ते जामीनपात्र कलम आहे. आयपीसीच्या कलम 354 डी मध्ये कमाल 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे तर हे कलम जामीनपात्र आहे.

यापूर्वी, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सीडीआर अहवाल आणि एफएसएल अहवाल दाखल करण्यास सांगितले होते. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, या प्रकरणाशी संबंधित परदेशात राहणाऱ्या काही लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ज्याचे उत्तर येणे बाकी आहे. आता या प्रकरणाचा एफएसएल अहवालही येणार आहे. तपासाचे इतर काही अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. याप्रकरणी भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एफएसएल अहवाल आणि प्रकरणाशी संबंधित इतर तपास अहवाल लवकरच दाखल करण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अहवाल लवकर मिळावा यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बृजभूषण शरण सिंह यांना WFI प्रमुख पदावरून हटवण्यासाठी कुस्तीपटूंनी प्रथम जानेवारीत दिल्लीतील मंतर मंतर येथे धरणे आंदोलन केले. त्यानंतर चौकशी समितीचे आश्वासन मिळाल्याने कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर अचानक तीन महिन्यांनी एप्रिलमध्ये दिल्लीत कुस्तीपटूंचा मेळावा झाला आणि बृजभूषण यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणी एफआयआरची मागणी करण्यात आली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, अटक न करण्याच्या मुद्द्यावरून कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलन तिव्र केले. दरम्यान, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करून बृजभूषण यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून क्लीन चिट दिली.

Back to top button