

पुढारी ऑनलाईन डेस्क : ricky ponting : लॉर्ड्स कसोटीच्या वादानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सध्याचा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे कौतुक केले आहे. त्याने स्टोक्सच्या सामना जिंकण्याच्या क्षमतेची तुलना एमएस धोनीशी केली आहे. पाँटिंग म्हणाला की, धोनी ज्या पद्धतीने दबावाची परिस्थिती सक्षमपणे हाताळायचा तशीच स्टोक्स शैली आहे. खरेतर इंग्लिश कर्णधार हा त्याच्या समकालीन खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे,' असे मत व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत बेन स्टोक्सने 214 चेंडूत 155 धावा केल्या. यापूर्वी 2019 मध्येही त्याने अॅशेसमधील लीड्समध्ये कसोटीत नाबाद 135 धावा फटकावून इंग्लंडला एक गडी राखून विजय मिळवून दिला होता. पॉन्टिंगने एका मुलाखतीत म्हटले की, 'मला वाटते की आंतरराष्ट्रीय खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याच्यावर दबाव असतो, पण स्टोक्स मधल्या किंवा खालच्या फळीत आला तरी तो सामना जिंकण्याची परिस्थिती निर्माण करतो.'
रिकी पाँटिंग म्हणाला, 'क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका खूप महत्त्वाची असते. धोनी हा या बाबतीत जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे. त्याने बहुतेक टी-20 सामन्यांमध्ये ही भूमिका पार पाडली आहे. तर कसोटी सामन्यांमध्ये धोनी प्रमाणेच स्टोक्स फिनिशरचे काम चोखपणे बजावत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अशी कामगिरी फार थोडे खेळाडू करू शकले आहेत.'
लॉर्ड्स कसोटीत बेन स्टोक्सच्या फलंदाजीदरम्यानच्या हेडिंग्ले कसोटीतील खेळी (वर्ष 2019) आठवत असल्याचे रिकी पाँटिंगने सांगितले. रिकी पॉन्टिंग म्हणाला, 'कदाचित सगळ्यांना वाटले असेल की तो पुन्हा असे करेल, कारण आम्ही त्याला यापूर्वी असे करताना पाहिले होते पण यावेळी धावा जास्त होत्या.'
कसोटी क्रिकेटमध्ये स्टोक्सची फलंदाजी सरासरी केवळ 36.36 आहे, तर गोलंदाजीत त्याची सरासरी 32.07 पेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी कमी आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंची क्षमता त्याच्या आकडेवारीवरून ठरवली जाते. असे केल्याने स्टोक्सच्या प्रतिभेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे या दिग्गज इंग्लिश फलंदाजासाठी आकडेवारी बाजूला ठेऊन त्याच्या क्षमतेचे कौतुक केले पाहिजे,' असेही पाँटिंगने स्पष्ट केले.