Ashes 2023 : रडणारं मूल! ऑस्ट्रेलियन मीडियाकडून बेन स्टोक्सची खिल्ली | पुढारी

Ashes 2023 : रडणारं मूल! ऑस्ट्रेलियन मीडियाकडून बेन स्टोक्सची खिल्ली

सिडनी, वृत्तसंस्था : सध्या इंग्लंडच्या धर्तीवर अ‍ॅशेस (Ashes 2023) मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. या सामन्यातील एक वादग्रस्त विकेट तिसर्‍या दिवशीही वर्तमानपत्रात झळकत आहेत. दुसर्‍या सामन्यातील पराभवापेक्षा इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अलेक्स कॅरीने अखिलाडीवृत्तीने रनआऊट केल्याने वादाला तोंड फुटले.

अखिलाडीवृत्तीने बेअरस्टोला बाद केल्याचे सांगत इंग्लिश खेळाडूंसह प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. बेन स्टोक्सला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बेअरस्टोच्या विकेटबद्दल विचारले असता त्याने म्हटले, जॉनी आपल्या क्रीझवर होता आणि नंतर बाहेर पडला, पण त्याला बाद दिले गेले. आता मला याविषयी काहीही बोलायचे नाही.

ऑस्ट्रेलियामधील वृत्तपत्र ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ने बेन स्टोक्सच्या विधानाचा दाखला देत त्याची खिल्ली उडवली. आपल्या पहिल्याच पानावर बेन स्टोक्सचा रडणारे मूल असा उल्लेख करत ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने निशाणा साधला. याला स्टोक्सने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले. तो मी असूच शकत नाही. मी कधी नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली, अशा शब्दांत स्टोक्सने उत्तर दिले, ज्याचे कौतुक केले जात आहे.

नेमके काय घडलं?

दुसर्‍या कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावाच्या 52व्या षटकात कॅमेरून ग्रीनने टाकलेला चेंडू चुकवण्यासाठी जॉनी बेअरस्टो खाली वाकला. चेंडू निर्धाव गेला अन् षटक संपले असे गृहीत धरून बेअरस्टो क्रीझला पाय घासून पुढे गेला. तेवढ्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक कॅरीने चेंडू यष्ट्यांवर मारला आणि कांगारूच्या खेळाडूंनी अपील केली. पण नियमानुसार चेंडू डेड झाला नव्हता. त्यामुळे तिसर्‍या पंचांनी बेअरस्टोला बाद केले अन् इंग्लंडला मोठा झटका बसला.

Back to top button