Steve Smith : 15 हजारी बनत स्मिथने मोडला भारताचा विक्रम, ऑस्ट्रेलिया बनला नंबर-1 | पुढारी

Steve Smith : 15 हजारी बनत स्मिथने मोडला भारताचा विक्रम, ऑस्ट्रेलिया बनला नंबर-1

पुढारी ऑनलाईन डेस्क : Steve Smith : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारताचा 15 हजारांचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. खरे तर, लॉर्ड्स कसोटीत स्मिथने वैयक्तिक 84 धावसंख्या करताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो 9वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या 8-8 फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा आकडा गाठला होता, मात्र स्टीव्ह स्मिथच्या या कामगिरीने ऑस्ट्रेलियाने आता भारताला मागे टाकले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्टीव्ह स्मिथ 85 धावांवर नाबाद राहिला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 339 धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत रिकी पॉन्टिंग अव्वल स्थानी आहे. त्याने 560 सामन्यांमध्ये 27483 धावा केल्या आहेत. तर जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम आहे. मास्टर ब्लास्टरने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या 664 सामन्यांमध्ये 34357 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी :

ऑस्ट्रेलिया : रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क, मार्क वॉ, अॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, स्टीव्ह स्मिथ

भारत : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मोहम्मद अझरुद्दीन

श्रीलंका : कुमार संगकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, अरविंद डी सिल्वा

वेस्ट इंडिज : ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, ख्रिस गेल, डेसमंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स

दक्षिण आफ्रिका : जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, ग्रॅम स्मिथ

पाकिस्तान : जावेद मियांदाद, इंझमाम-उल-हक, युनूस खान, मोहम्मद युसूफ

न्यूझीलंड : रॉस टेलर, केन विल्यमसन, स्टीफन फ्लेमिंग

इंग्लंड : जो रूट, अॅलिस्टर कुक

बांगलादेश : तमिम इक्बाल

लॉर्ड्स कसोटीत ऑस्ट्रेलिया मजबूत

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुस-या कसोटीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 339 धावा केल्या. वॉर्नरशिवाय ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने अर्धशतके झळकावली. स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी नाबाद राहिले. 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर कांगारू 1-0 ने आघाडीवर आहेत.

Back to top button