BAN vs AFG : बांगलादेशचा कसोटीमध्‍ये ऐतिहासिक विजय, ११२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित! | पुढारी

BAN vs AFG : बांगलादेशचा कसोटीमध्‍ये ऐतिहासिक विजय, ११२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्तान विरुद्धचा सामना ५४६ धावांच्या फरकाने जिंकत कसोटी क्रिकेटमध्‍ये आज बांगलादेशने इतिहास रचला. धावांच्या फरकाने मिळवलेला हा २१ व्‍या शतकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्‍यात बांगलादेशने अनेक नवे विक्रम आपल्‍या नावावर केले. (BAN vs AFG)

BAN vs AFG : बांगलादेशची दमदार फलंदाजी

मीरपूर कसोटीत अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नजमुल हसन शांतोचे (१४६) आणि महमुदुल हसन जॉय (७६ धावांच्‍या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात ३८२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला पहिल्‍या डावात केवळ १४६ धावा करता आल्या, अफसर झजाईने सर्वाधिक 36 धावा केल्या. बांगलादेशचे वेगवान गोलंदाज इबादत हसन याने ४७ धावांमध्‍ये चार तर शोरीफुल इस्लाम २८ धावांमध्‍ये दोन बळी घेतले.

दुसर्‍या डावातही अफगाणिस्‍तानच्‍या फलंदाजांकडून निराशा

बांगलादेशला पहिल्या डावात 236 धावांची आघाडी मिळाली होती. संघाने फॉलोऑन देण्‍याऐवजी दुसर्‍या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही बांगलादेशकडून नजमुल हसन शांतोने १२४, झाकीर हसन ७१ धावा केल्‍या. मोमिनुल हक नाबाद १२१ आणि लिटन दासच्‍या नाबाद 66 धावांच्‍या जोरावर बांगलादेशने दुसर्‍या डावात ८० षटकांत ४२५ धावा केल्‍या. सामन्याच्या चौथ्या डावात अफगाणिस्तानसमोर ६६२ धावांचे मोठे लक्ष्य होते. बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुन्‍हा निराशा केली. संपूर्ण संघ केवळ ११५ धावांवर गारद झाला. या सामन्यात बांगलादेशकडून दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्या नजमुल हसन शांतोला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बांगलादेशचा आजवरचा धावांच्‍या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

बांगलादेशने मोडला ऑस्‍ट्रेलियाचा ११२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

कसोटी क्रिकेटमध्‍ये धावांच्या फरकाचा मोठा विजय इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्‍लंड संघाने १९२८ मध्‍ये ऑस्ट्रेलियाचा ६७५ पराभव केला होता. तर दुसरा मोठा विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. १९३४ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ५६२ धावांनी पराभव केला होता. बांगलादेशने आज ऑस्ट्रेलियाचा ११२ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. १९११ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५३० धावांनी पराभव केला होता.

Back to top button