पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Schedule Announcement : आशिया चषक स्पर्धेचे शेड्युल जाहीर करण्यात आले. आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी याची घोषणा केली. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार असून श्रीलंका आणि पाकिस्तान संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. स्पर्धेतील पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये आणि त्यानंतरचे सर्व नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
यंदाच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ सहभागी होत आहेत. एकूण 18 दिवस चालणाऱ्या या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत 13 सामने खेळवले जाणार असल्याचीही माहिती आहे. या हंगामातील 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकेत आयोजित केले जातील. या सामन्यांसाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 6 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. सुपर-4 फेरीतील अव्वल संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
पाकिस्तानमध्ये ग्रुप स्टेजमधील चार सामने खेळवले जाणार आहेत. यात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या सामन्यांचा समावेश आहे.
भारताचे पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धचे ग्रुप स्टेजमधील सामने श्रीलंकेत होणार आहेत. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 रँकिंगचे संघ सुपर-4मध्ये पोहोचतील. सुपर-4 चे सर्व सामने आणि फायनल श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.
यंदाची आशिया कप स्पर्धा यजमानपदावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली. एसीसीने त्याच्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला दिली होती, पण एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. अशा स्थितीत पाकिस्तानने विश्वचषकासाठी त्यांचा संघ भारतात पाठवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाद चिघळला. त्यातच बीसीसीआयने आशिया कपचे आयोजन तटस्थ ठिकाणी करावे अशी मागणी केली. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नाही आणि ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला. त्यानुसार भारताचे सामने पाकिस्तान सोडून बांगलादेशमध्ये खेळवले जावेत अशी पीसीबीने मागणी केली. पण हा प्रस्तावही बीसीसीआयने झुगारला. अखेर एसीसीने या स्पर्धेच्या तारखांची घोषणा करून सामन्यांचे ठिकाणही जाहीर केले.
आशिया कपमध्ये भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या स्पर्धेचे 15 हंगाम खेळवण्यात आले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018) विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा संघ 6 वेळा (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानला केवळ दोनदा (2000, 2012) विजेतेपद मिळवता आले आहे.