

भारत-पाकिस्तान दरम्यान सामना कोणताही असो, ते जणू एक प्रकारचे युद्धच असते. असेच 'युद्ध' आज होत आहे. त्यासाठी रणांगण सजले आहे…. योद्धेही सज्ज आहेत… प्रतीक्षा आहे ती फक्त नौबती झडण्याची! संध्याकाळी साडेसात वाजता मैदानातील पंच जेव्हा 'प्ले' असा आदेश देतील, तेव्हा सुरू होईल क्रिकेटच्या मैदानावरील महामुकाबला… यावेळी अवघ्या क्रिकेट विश्वाचे श्वास रोखले जाणार… कारण परस्परांचे पारंपरिक शत्रू असलेले भारत आणि पाकिस्तान हे देश टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकणार!
कोहलीच्या नेतृत्वाखालील विराट सेना आणि बाबर आझमची फौज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झुंजणार असली तरी जगातील कोट्यवधी डोळे या रणांगणाकडे रोखले जाणार आहेत. टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने पाकला 5 वेळा पाणी पाजले आहे. आज विराट सेना 6 व्यांदा असा पराक्रम करण्यास सज्ज आहे.
भारत – पाकिस्तान सामना होत असताना सट्टे बाजारालाही उधाण आले आहे. सध्या या सामन्यावर एक हजार कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. पण या सामन्याची वाढती क्रेझ लक्षात घेता हा आकडा दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता बुकींनी वर्तवली आहे.