लंडन, पुढारी ऑनलाईन : Ajinkya Rahane WTC Final : अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी करत इतिहास रचला आहे. ओव्हलच्या मैदानावर जिथे रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांसारखे फलंदाज फ्लॉप झालेले, असताना त्याच आक्रमणासमोर रहाणे संघासाठी भिंत बनला आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 92 चेंडूत अर्धशतक ठोकले. यासह, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला.
रहाणे 18 महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे. त्याने 46 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला षटकार खेचून 50 धावा पूर्ण केल्या. कसोटीतील हे त्याचे 26 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाच्या धावसंख्येने 200 चा टप्पा पार केला. 18 महिन्यानंतर संघात परतलेल्या अजिंक्य रहाणेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षांची पूर्ती करण्यात त्याने जोरदार प्रयत्न केले असून तो यशस्वी होत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची स्थिती एकदम नाजुक झाली आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना 71 धावांवरच चार गडी बाद झाले. रोहित शर्मा 15, शुभमन गिल 13, चेतेश्वर पुजारा 14 आणि विराट कोहली 14 धावा करून बाद झाले. त्यानंतर रहाणेने जडेजासोबत संयमी खेळी करून 71 धावांची भागिदारी साकारली.
दरम्यान, पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेला पंचांनी पायचीत दिले. पण नशिब जोरावर असेल तर कोण काय करू शकते? अजिंक्य रहाणेनं रिव्ह्यू घेतला आणि चमत्कार घडला. रिव्ह्यू तपासत असताना असे लक्षात आले की पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू नो बॉल होता. त्यामुळे अजिंक्य रहाणेला जीवदान मिळाले.