कुस्तीपटूंचे आंदोलन : रात्रीस ‘खेळ’ चाले..! | पुढारी

कुस्तीपटूंचे आंदोलन : रात्रीस ‘खेळ’ चाले..!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक महिन्यांपासून सुरू असलेला आंदोलनाला वेगळे वळण मिळाले आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांची भेट घेतल्यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह नोकरीवर परतले आहेत. मात्र, त्यांनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. याशिवाय तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतल्याचे वृत्तही चुकीचे असल्याचे कुस्तीपटूंनी स्पष्ट केले.

साक्षी मलिकने तिच्या कामावर परतल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे, पण आंदोलनातून माघार घेतल्याचा तिने इन्कार केला. तिने ट्विटरवर लिहिले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आपल्यापैकी कोणीही मागे हटले नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका.

कुस्तीपटूंनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे 2 तास चालल्याचा दावा केला जात आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात चौकशीच्या मागणीसोबतच कुस्तीपटूंनी त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा आग्रह धरल्याचेही बोलले जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, गृहमंत्री अमित शहा आणि कुस्तीपटूंची ही बैठक शनिवारी रात्री 11 वाजता झाली ज्यामध्ये साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया सामील होते. खाप पंचायतींनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला असताना अमित शहा यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आहे.

या सोबतच अमित शहा यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बैठकीत कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेचा आग्रह धरला आणि लवकरात लवकर कारवाईची मागणी केली. यानंतर कुस्तीपटूंनी हे प्रकरण जलदगतीने मार्गी लावण्याची मागणी सुरू केल्यावर सुमारे दोन तासांच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना सांगितले की, पोलिसांना त्यांचे काम करण्यासाठी वेळ देऊ या. पोलिसांचा तपास निष्पक्ष होईल आणि त्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणतीही हयगय होणार नाही? शहा यांच्या आश्वासनावर कुुस्तीपटूंचे समाधान झाले आणि ते कर्तव्यावर परतले.

रविवारी (4 जून) कुस्तीपटू बजरंग पुनिया सोनीपतला पोहोचला. तेथे तो म्हणाला, लवकरच सर्व संघटनांना एकत्र बोलावून मोठी पंचायत होणार आहे. याबाबत तीन-चार दिवसांत निर्णय होईल.

कुस्तीपटूंचे 138 दिवस आंदोलन

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर दोनवेळा आंदोलन केले. पहिले आंदोलन हे चौकशी समिती स्थापून क्रीडा मंत्रालयाने थोपवले होते. मात्र, या समितीच्या अहवालाबाबत नाराजी व्यक्त करत कुस्तीपटूंनी दुसर्‍यांदा जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन एफआयआर देखील दाखल झाले. मात्र, आंदोलक कुस्तीपटू बृजभूषण यांना अटक करण्यात यावी, या मागणीवर ठाम होते. देशाचे पदक विजेते कुस्तीपटू 138 दिवस आंदोलन करत होते. 18 जानेवारीला पहिल्यांदा कुस्तीपटूंनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर 23 एप्रिलला दुसर्‍यांदा त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी कुस्तीपटूंची आणि पोलिसांची झटापटदेखील झाली.

यानंतर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पोलिसांनी बळाचा वापार करत कुस्तीपटूंना जंतर-मंतरवरून हलवले. यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले. मात्र अमित शहा यांच्यासोबत शनिवारी मध्यरात्री बैठक झाली अन् कुस्तीपटू पुन्हा आपल्या सरकारी सेवेत रुजू झाले. जरी ते सेवेत रुजू झाले असले तरी त्यांनी आदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

असे सुरू झाले कुस्तीपटूंचे आंदोलन

18 जानेवारी रोजी 30 भारतीय कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर – मंतरवर आंदोलन सुरू केले. या आंदोलनचे नेतृत्व बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट करत होते. या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर संघटनेत मनमानी कारभार करणे आणि महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचे आरोप केले.

21 जानेवारी रोजी भाजप खासदार असलेल्या बृजभूषण यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले. अनेक अधिकार्‍यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली, मात्र तोडगा काही निघाला नाही. अखेर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आणि 21 जानेवारीला आंदोलन मागे घेण्यात आले. बृजभूषण यांना कुस्ती महासंघाच्या कामकाजापासून दूर राहण्यास सांगितले.

या प्रकरणाची चौकशी करणार्‍या समितीला एप्रिलमध्ये अहवाल सादर करायचा होता. समितीने उशिरा अहवाल सादर केला. हा अहवाल कधी सार्वजनिक झाला नाही. मात्र, याचदरम्यान या अहवालात बृजभूषण यांना निर्दोष ठरवण्यात आल्याची बातमी आली.

23 एप्रिलला कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले. बृजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.

कुस्तीपटूंचे हे आंदोलन दिवसागणिक मोठे होत गेले, मात्र बृजभूषण निर्दोष असल्याचे सांगत होते. 23 एप्रिललाच दिल्लीच्या कनौट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नव्हती.

25 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिल्ली पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले. यावेळी बृजभूषण यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या. यातील एक एफआयआर पोक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर दाखल करूनदेखील बृजभूषण यांना अटक झाली नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यानच्या काळात बृजभूषण यांच्याकडून अनेक वक्तव्य करण्यात आली. त्याला कुस्तीपटूंनी देखील प्रत्युत्तर दिले.

29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आप पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली.

4 मे सर्वोच्च न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्यविरुद्धची महिला कुस्तीपटूंची याचिका फेटाळून लावत त्यांना खालच्या न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.

27 एप्रिलला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या तीन सदस्यांची समिती स्थापन करून भारतीय कुस्ती महासंघाचे दैनंदिन कामकाजावर देखरेख करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या समितीवर 45 दिवसांत भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक घेण्याची देखील जबाबदारी देण्यात आली. या समितीत सुमा शिरूर, भुपेंद्रसिंह बाजवा आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश करण्यात आला.

7 मे कुस्तीपटूंच्या या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची एन्ट्री झाली. त्यांनी जंतर-मंतरवर जाऊन कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यानंतर अनेक वक्तव्य दोन्ही बाजूकडून झाली.

23 मे कुस्तीपटूंनी कँडल मार्च आयोजित केला. यात खाप पंचायतींनी देखील सहभाग घेतला.

28 मे यानंतर कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर शांतीपूर्ण मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या या भागात 144 कलम लागू असतानाही कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत कुस्तीपटूंना बळाचा वापर करत ताब्यात घेतले.

30 मे दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत जंतर-मंतरवरून कुस्तीपटूंना हलवले. मात्र, यानंतर कुस्तीपटूंनी त्यांची सर्व पदके गंगेत प्रवाहित करण्याची धमकी दिली. कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचल्या देखील, मात्र शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी त्यांची समजूत काढली अन् त्यांना पदके प्रवाहित करण्यापासून रोखले.

4 जून कुस्तीपटूंनी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत काय झाले हे सविस्तररीत्या काही बाहेर आले नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी कुस्तीपटूंना पोलिसांचे काम त्यांना करू द्या त्यांना थोडा वेळ द्या, असे सांगितले.

5 जून आंदोलनातील बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट हे सर्व महत्त्वाचे कुस्तीपटू पुन्हा एकदा आपल्या सरकारी सेवेत रुजू झाले.

Back to top button