ENG vs IRE Test : इंग्लंडने आयर्लंडला चिरडले! 10 विकेट्स राखून दणदणीत विजय | पुढारी

ENG vs IRE Test : इंग्लंडने आयर्लंडला चिरडले! 10 विकेट्स राखून दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : eng vs ire test : लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने आयर्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर दुसऱ्या डावात केवळ 11 धावांचे लक्ष्य होते, जे यजमान संघाने केवळ चार चेंडूत गाठले आणि बिनबाद 12 धावा करून सामना खिशात घातला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक अनोखा विक्रम केला. संघाचे नेतृत्व करताना त्याने एकदाही फलंदाजी किंवा गोलंदाजी केली नाही, पण तरीही इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे अशी कामगिरी स्वत:च्या नावावर नोंद होणारा स्टोक्स हा कसोटी इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे.

या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आयर्लंडचा संघ अवघ्या 172 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 4 बाद 524 धावा करून डाव घोषित केला. इंग्लंडकडून ओली पोपने शानदार द्विशतक झळकावले. त्याने 208 चेंडूत 205 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 22 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय बेन डकेटने 178 चेंडूत 182 धावांची शानदार खेळी केली. आयर्लंडकडून अँडी मॅकबर्नीने सर्वाधिक 2 बळी घेतले. (eng vs ire test)

दुसऱ्या डावात आयर्लंडचा संघर्ष

पहिल्या डाव झटपट गडगडल्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडच्या फलंदाजांनी काहीशी झुंज दिली. दुसऱ्या दिवशी आयर्लंडने 97 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर लॉर्कन टकर आणि हॅरी टकर यांनी तिसऱ्या दिवशी पाचव्या विकेटसाठी 105 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली. खालच्या फळीत मार्क एडेअर आणि अँडी मॅकब्रायन यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लिश गोलंदाज जोश टँगने 5 बळी घेत आयर्लंडला खिंडार पाडले. (eng vs ire test)

मार्क अडायरचे पहिले कसोटी शतक हुकले

अष्टपैलू अडायरने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी खेळली. मात्र, तो दुर्दैवी ठरला आणि त्याचे शतक केवळ 12 धावांनी हुकले. त्याने डावात 115.79 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 76 चेंडूत 88 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. अडायरने अँडी मॅकब्रायनसोबत 8व्या विकेटसाठी 165 चेंडूत 163 धावांची शानदार भागीदारी केली.

मॅकब्रायनची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी

आयर्लंडसाठी खालच्या क्रमाने फलंदाजी करताना मॅकब्रायनने शानदार खेळी केली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. त्याने 74.78 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 115 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 14 चौकार मारले. या डावखु-या फलंदाजाने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारी करून संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

टेक्टरचे कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक

टेक्टर एक टोक धरून आयर्लंडसाठी दीर्घकाळ झुंज दिली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. मात्र, संघाचा पराभव टाळण्यात तो अपयशी ठरला. टेक्टरने 52.04 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 98 चेंडूत 51 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकारही लगावला. 4 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत टेक्टरने 42.00 च्या सरासरीने 738 धावा केल्या आहेत.

इंग्लंडने अर्धी लढाई आधीच जिंकली

तत्पूर्वी इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात 4 बाद 524 धावांवर घोषित करताना अर्धी लढाई आधीच जिंकली होती. एकप्रकारे यजमान संघाने पहिल्या डावात 352 धावांची आघाडी घेत पाहुण्या आयर्लंड संघावर मानसिक दबाव टाकला. द्वीशतकवीर पोप आणि शतकवीर डकेट यांच्याशिवाय सलामीवीर जॅक क्रॉली (56) आणि माजी कर्णधार जो रूट (56*) यांनी अर्धशतके झळकावली.

पोप इंग्लंडसाठी सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज

पोपने पहिल्या डावात द्विशतक झळकावून एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत द्विशतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. अवघ्या 207 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. त्याने आपल्या डावात 208 चेंडूंचा सामना करत 98.56 च्या इकॉनॉमी रेटने शानदार 205 धावा केल्या. या मॅरेथॉन इनिंगमध्ये त्याने 22 चौकार आणि 3 षटकार मारले.

डकेटने शतक झळकावून सिद्ध आपली क्षमता

सलामीवीर डकेट या सामन्यात थोडा दुर्दैवी ठरला आणि त्याचे कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक केवळ 18 धावांनी हुकले. तो सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या 11 डावांमध्ये 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. आयर्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीतही तो लयीत दिसला. त्याने 102.25 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 178 चेंडूत 182 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 1 षटकार लगावला.

रूटच्या सर्वात कमी वेळेत 11,000 कसोटी धावा

इंग्लंडचा माजी कर्णधार रूटसाठीही हा सामना खास ठरला. पदार्पणानंतर सर्वात कमी वेळेत 11 हजार कसोटी धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे. रूटने हा आकडा अवघ्या 10 वर्षे 171 दिवसांत गाठला. रूटनंतर या यादीत इंग्लंडचा माजी धडाकेबाज फलंदाज अॅलिस्टर कुकचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 10 वर्षे 290 दिवसांत 11,000 धावा केल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडचा खास विक्रम

वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने प्रभावी गोलंदाजी करत पहिल्या डावात 5 बळी घेतले. त्याने या सामन्यात चमकदार कामगिरी करत पहिल्या 7 षटकातच 3 बळी घेतले. 36 वर्षीय ब्रॉड हा गेल्या 25 वर्षात कसोटी सामन्याच्या पहिल्या सात षटकात दोनदा तीन बळी घेणारा एकमेव गोलंदाज ठरला. उजव्या हाताचा गोलंदाज ब्रॉडने यापूर्वी 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

Back to top button