पाकिस्तान विजयाचा जल्लोष करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनींवर युएपीए | पुढारी

पाकिस्तान विजयाचा जल्लोष करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनींवर युएपीए

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

श्रीनगर मधील मेडिकल कॉलेजमध्ये पाकिस्तान विजयाचा जल्लोष करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोध कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवारी पाकिस्तानने टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिल्यांदाच १० विकेट्सनी पराभव केला. भारताच्या या परभवानंतर श्रीनगर आणि शेरे काश्मीर मेडिकल कॉलेजमधील मुलींच्या वसतीगृहात काही विद्यार्थिनींनी जल्लोष करुन पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी करत असल्याचा एख व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी करण नगर आणि सौरा या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या युएपीए अतंर्गत एफआयआर दाखल झाल्या आहेत. अमित शहा श्रीनगरच्या दौऱ्यावर असताना श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर होते. त्यांचा हा ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतरचा पहिलाच दौरा होता.

पाकिस्तान विजयाचा जल्लोष : ४८ तासात अहवाल देणार

शेरे काश्मीर मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थी पाकिस्तान विजयाचा जल्लोष करत असल्याच्या या कथित व्हिडिओबद्दल सत्यता पडताळणीसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती येत्या ४८ तासात सरकारला आपला अहवाल सादर करेल. हे अधिकारी म्हणतात, ‘आम्हाला आमच्या संस्थेत असा जल्लोष झाल्याची कोणतीही चिन्हे दिसलेली नाहीत. तरीही आम्ही तपास करत आहोत. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. ते सरकारला ४८ तासात आपला अहवाल सादर करतील.’

हेही वाचा :  हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; दहशतीचे वातावरण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस काश्मीरमधील अनेक ठिकाणाहून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष केल्याचे व्हिडिओ आले आहेत त्याचा तपास करत आहेत.

पाकिस्तान विजयाचा जल्लोष : कडक शिक्षेएवजी पुन्हा मार्गावर आणा!

दरम्यान, या विद्यार्थिनींवर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर जम्मू काश्मीर पिपल्स कॉन्फरन्स नेते सजाद लोन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करु नये अशी मागणी केली.

ते म्हणाले की, ‘मी याच्या सक्त विरोधात आहे. जर तुम्हाला ते एखाद्या दुसऱ्या संघासाठी घोषणाबाजी करत असल्यामुळे ते देशप्रेमी वाटत नसतील तर तुमच्याकडे त्यांना देशप्रेमाच्या मार्गावर पुन्हा आणण्याचे धाडस आणि विश्वास असला पाहिजे. त्यांना दंडात्मक शिक्षा करुन, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून काहीही होणार नाही. अशा कारवायांचा पूर्वीही फायदा झाला नव्हता.’

Back to top button