फॉर्ममध्ये नसलेल्या इऑन मॉर्गन याची वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठी घोषणा - पुढारी

फॉर्ममध्ये नसलेल्या इऑन मॉर्गन याची वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठी घोषणा

दुबई : पुढारी ऑनलाईन

इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याचा फलंदाजीतला फॉर्म हा तितकासा चांगला नाही. आयपीएलमध्ये तो नेतृत्व करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत धडक मारली होती. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात केकेआरला आक्रमक खेळ करूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र या संघाचा नेता फलंदाजीत संपूर्ण आयपीएलमध्ये फेल गेला. इऑन मॉर्गन खेळलेल्या ९ आयपीएल सामन्यातील सहा सामन्यात दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नव्हता. याचबरोबर मॉर्गनची इंग्लंडकडून २०२१ मध्ये खेळलेल्या टी २० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या २८ आहे.

अशा खराब फॉरमधून जात असलेला इऑन मॉर्गन इंग्लंड संघाचा कर्णधार आहे. कर्णधार आहे म्हणून मॉर्गनचा खराब फॉर्म झाकून जात नाही. त्याच्या खराब फॉर्मची चर्चा होत आहे. यावर इऑन मॉर्गनने टी २० वर्ल्डकपची मुख्य सुपर १२ फेरी सुरु होण्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. त्याने जर माझ्या संघाला माझ्याशिवाय टी २० वर्ल्डकप जिंकण्याची अधिक संधी असेल तर मी स्वतःला संघातून वगळेन असे मोठे वक्तव्य केले आहे.

मधल्या फळीत फलंदाजी करणे सोपे नाही : इऑन मॉर्गन

इऑन मॉर्गन आपल्यावर फलंदाजी करताना काय जबाबदारी असते याच्याकडे लक्ष वेधत म्हणाला, ‘माझा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून रोल असतो की लवकरात लवकर मोठे फटके मारून धावा वाढवणे. या रोलमध्ये जोखीमही मोठी असते. या स्थानावर फलंदाजी करताना तुमच्या फॉर्ममध्ये सातत्य ठेवणे सोपे नाही.’

मॉर्गनने आपल्या नेतृत्वाने इंग्लंडला मर्यादीत षटकांच्या क्रिकेमध्ये एका चांगल्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. असे असले तरी त्याला त्याच्या खराब फॉर्ममधून लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचे आहे. कारण तरच इंग्लंडच्या फलंदाजीत डेप्थ निर्माण होईल. नाहीतर इऑन मॉर्गन एका वेगळ्याच चक्रव्ह्युवात अडकणार आहे.

हेही वाचा : रोहित शर्मा याची टी-20 संघाच्या कर्णधारपदी वर्ल्डकपनंतर निवड ?

मॉर्गन स्वतःला संघातून वगळण्याबाबत म्हणतो की, ‘हा कायम एक पर्याय असतोच. मी संघच्या वर्ल्डकप जिंकण्यामध्ये अडथळा होऊ इच्छित नाही. माझ्याकडून धावा होत नाही आहेत मात्र मी संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे.’

टी २० वर्ल्डकपमधील इंग्लंडचा २३ ऑक्टोबरला पहिला सुपर १२ मधील सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज बरोबर होत आहे. इंग्लंड ग्रुप १ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंडला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पात्रता फेरी खेळून पात्र झालेल्या दोन संघाबरोबर दोन हात करायचे आहेत.

Back to top button