Yashasvi Jaiswal WTC : यशस्वी जैस्वालची भारतीय संघात एंट्री! WTC फायनलमध्ये ‘या’ खेळाडूची घेणार जागा | पुढारी

Yashasvi Jaiswal WTC : यशस्वी जैस्वालची भारतीय संघात एंट्री! WTC फायनलमध्ये ‘या’ खेळाडूची घेणार जागा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनेक विक्रमी खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीत तो लवकरच टीम इंडियामध्ये प्रवेश करेल असे भाकीत क्रिकेट तज्ज्ञांनी केले होते, आणि ते भाकीत खरे ठरले आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने मोठी घोषणा करत यशस्वी जैस्वालची टीम इंडियात निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. सध्या यशस्वीचे नाव स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत जरी असले तरी तो लवकरच प्लेईंग 11 मध्ये खेळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून सामना होणार आहे. दोन्ही संघांचे संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. टीम इंडियाने सलग दुस-यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2019-21 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे टीम इंदियाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. ज्यामध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. (Yashasvi Jaiswal WTC)

राहुल द्रविड यांच्या मागणीनुसार बदल

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफी सामन्यात त्याने सलग 7 षटकार ठोकले. या कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्याला डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्टँडबाय ओपनर म्हणून संघात सामील केले होते, परंतु त्याचा विवाह सोहळा 3-4 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत त्याने तो 5 जूननंतर संघात सामील होण्यासाठी बोर्डाला विनंती केली होती, परंतु संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्या जागी बदली खेळाडूची मागणी बोर्डाकडे केली. त्याप्रमाणे बोर्डाने यशस्वी जैस्वाल याला सराव सुरू करण्यास सांगितले असून काही दिवसांत तो इंग्लंडला रवाना होईल अशी माहिती समोर आली आहे.

जैस्वालचा आयपीएलमध्ये धमाका (Yashasvi Jaiswal WTC)

यशस्वी जैस्वाल धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 48.08 च्या सरासरीने 625 धावा फटकावल्या. ज्यात पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने लक्षवेधी खेळी केल्या आहेत. त्याने रणजी ट्रॉफीच्या पाच सामन्यांमध्ये 404 धावा केल्या आहेत.

भारतीय संघ इंग्लंडला जाणार

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन 28 मे रोजी लंडनला रवाना होतील. तर शुभमन गिल, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी आयपीएलची फायनल खेळून 30 मे रोजी लंडन गाठतील. या तिघांच्या सोबतील सूर्यकुमार यादवही असेल.

WTC Final साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार

Back to top button