MI vs GT : मुंबईचा पराभव करत गुजरात टायटन्स फायनलमध्ये | पुढारी

MI vs GT : मुंबईचा पराभव करत गुजरात टायटन्स फायनलमध्ये

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : गतविजेत्या गुजरात जायंटस्ने आपले विजेतेपद कायम राखण्याच्या द़ृष्टीने अंतिम पाऊल टाकले असून त्यांनी आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या क्वॉलिफायर-2 सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने या सामन्यात 129 धावांची वादळी खेळी केली. या वादळात सहावे विजेतेपद जिंकण्याचे मुंबईचे स्वप्न उडून गेले. गुजरातचा आता विजेतेपदाचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध उद्या (रविवारी) होणार आहे. (MI vs GT)

प्रथम फलंदाजी करणार्‍या गुजरातने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई करीत 3 बाद 233 धावा केल्या. मुंबईला हे आव्हान पेलले नाही. त्यांचा डाव 18.2 षटकांत 171 धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 61 धावा केल्या.

शुभमनच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईकडून तिलक वर्माने धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवनेही 61 धावांची खेळी केली. मुंबईची धावगती जबरदस्त होती. मात्र, गुजरातने मोक्याच्या क्षणी मुंबईच्या विकेटस् घेत त्यांचा डाव 171 धावात गुंडाळला. गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटकात 5 विकेटस् घेत भेदक मारा केला. त्याने महत्त्वपूर्ण सूर्यकुमारची विकेट घेतली आणि मुंबईचा पराभव निश्चित केला.

तत्पूर्वी, पावसामुळे सामना अर्धा तास उशीरा सुरू झाला. पण त्यानंतर शुभमन गिलने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला दोनशेपार नेले. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी सोडलेले त्याचे झेल मुंबई इंडियन्सला महागात पडले. मुंबई इंडियन्सचे सर्व डावपेच चुकले.

शुभमन आणि वृद्धीमान साहा (18) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पियुष चावलाने गुजरातला पहिला धक्का दिला. त्यानंतर शुभमन व साई सुदर्शन यांचाच बोलबाला राहिला. शुभमनने 49 चेंडूंत 4 चौकार व 8 षटकारांसह यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावले. साई सुदर्शनने दुसर्‍या विकेटसाठी शुभमनसह 64 चेंडूंत 138 धावांची भागीदारी केली. शुभमनचा प्रत्येक फटका वाखाण्यजोगा होता आणि त्यात कोणताच आक्रसताळेपणा नव्हता. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी अन् मनगटाचा सुरेख वापर करून चेंडू कसा भिरकावा हे आज शुभमनने दाखवून दिले. त्याचे फटके नेत्रदीपक होते अन् रोहितनेही त्याचे कौतुक केले. 17 व्या षटकात मधवालने महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शुभमन 60 चेंडूंत 7 चौकार व 10 षटकारांसह 129 धावांवर झेलबाद झाला.

शुभमनच्या फटकेबाजीने मुंबईचे गोलंदाज गांगरले होते आणि सुदर्शन व हार्दिक पांड्या यांनी याचा पूरेपूर फायदा उचलला. सुदर्शनला 43 (31 चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानावर आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने 13 चेडूंत 28 धावा करताना गुजरातला 3 बाद 233 धावांपर्यंत पोहोचवले.

शुभमनने प्ले-ऑफमध्ये आणले, बाहेरही काढले

गुजरात टायटन्सने लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफचे तोंड पाहिले. याच सर्व श्रेय त्यावेळी 104 धावांची शतकी खेळी करणार्‍या शुभमन गिलला गेले. मात्र, याच मुंबईला प्ले-ऑफची दारे उघडून देणार्‍या शुभमन गिलने मुंबईचे क्वॉलिफायर-2 मध्ये पॅक अप केले. यावेळीही त्याने 129 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली.

Back to top button