

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून भारतात हजारो कोटींची उलाढाल होते. त्यातच आयपीएल सामने सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडली. भारतीय क्रिकेट जगात श्रीमंत असला तरी त्याला करांसह विविध सवलती देण्याचे राज्य सरकारांचे धोरण मात्र कायम आहे.
क्रिकेट सामन्यांवेळी तैनात केल्या जाणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठीचे दर राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या या दरांत तब्बल ३५ ते ६० लाखांपर्यंत घट करण्यात आली आहे. एकीकडे इतर क्षेत्रातील करांचा बोजा वाढत असताना क्रिकेट आयोजकांवरील या मेहरबानीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षानंतर पोलिस बंदोबस्तापोटी आकारायचे नवीन दर जाहीर केले आहेत. दरवर्षी जून महिन्यात हे दर जारी केले जातात. मात्र, मागील दोन वर्षे कोरोनामुळे दर जैसे थे ठेवण्यात आले. सोमवारी गृहविभागाने नवीन दर निश्चित केले आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील सामन्यांसाठी यापुर्वी वेगवेगळे दर आकारले जात. आता मात्र महाराष्ट्रभरातील सामन्यांसाठी एकच दर निश्चित करण्यात आला आहे. आता यापुढे महाराष्ट्रात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीत तसेच आयपीएलच्या एका टि-२० सामन्यासाठी पोलिस बंदोबस्तापोटी दहा लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे.
तर, एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रत्येकी २५ लाख तसेच पाच दिवसीय कसोटी सामन्यासाठी २५ लाखाचा दर निश्चित करण्यात आला आहे आतापर्यंत टी-२० सामन्यांसाठी ६० लाख, एकदिवसीयसाठी ५० लाख तर कसोटी सामन्यांच्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात तब्बल ३५ लाखांची घट पाहायला मिळत आहे. त्यातच आज जाहीर झालेले दर २०११ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू असणार आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्तापोटी यापूर्वी भरलेले अतिरिक्त रक्कम आयोजकांना परत करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.