Akash Madhwal IPL 2023 | मुंबईचा ‘मॅच विनर’ आकाश मधवाल आहे तरी कोण?

Akash Madhwal IPL 2023 | मुंबईचा ‘मॅच विनर’ आकाश मधवाल आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सने बुधवारच्या एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपरजायंटस्चा 81 धावांनी धुव्वा उडवला. आकाश मधवाल या तरुण वेगवान गोलंदाजाने विजय मिळवून देण्यासाठी पाच विकेट्स घेतल्या. आकाशच्या वेगवान गोलंदाजीने लखनौच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. त्याने 3.3 षटकांत अवघ्या 5 धावा देऊन लखनौचा निम्मा संघ तंबूत पाठवला. आकाशची ही अप्रतिम कामगिरी पाहिल्यानंतर चाहत्यांना या खेळाडूबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जाणून घेवूया आकाश मधवाल कोण आहे?

जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर ही दोन मोठी नावे मुंबई इंडियन्सचे चाहते यंदाच्या आयपीएलमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. दुखापतीमुळे बुमराहने या स्पर्धेत भाग घेतला नाही तर जोफ्रा आर्चरलाही बाहेर जावे लागले. अशा स्थितीत या दोन दिग्गज खेळाडूंची कमतरता कोण भरून काढणार, हा प्रश्न होता. कर्णधार रोहित शर्माने अनेक खेळाडूंना संधी दिली, मात्र केवळ आकाश मधवालच त्यावर तग धरू शकला. एमआयसाठी पदार्पण केल्यापासून आकाश चांगलाच फॉर्ममध्ये आहे. परंतु लखनौ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने फक्त 5 धावांत 5 विकेट घेतल्यावर तो चर्चेत आला आहे.

कोण आहे आकाश मधवाल?

आकाश मधवालचा जन्म २५ नोव्हेंबर १९९३ रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे झाला. त्याचे वडील भारतीय लष्करात आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला आकाश मधवाल हा आयपीएलमध्ये खेळणारा उत्तराखंडचा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याला एमआयने 2022 मध्ये सूर्यकुमार यादवच्या बदली म्हणून निवडले होते. वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत तो फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता.

इंजिनिअरिंगनंतर क्रिकेटची आवड वाढली

लहानपणी आकाशला क्रिकेटची विशेष ओढ नव्हती. त्याने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आकाशची क्रिकेटची आवड वाढली. पूर्वी आकाश फक्त टेनिस बॉलने क्रिकेट खेळत होता. 24 वर्षांचा झाला तेव्हा त्याने क्रिकेट खेळण्यासाठी पहिल्यांदा लेदर बॉलचा वापर केला. उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर हे आकाशच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरले. 2019 मध्ये त्याने वसीम जाफर आणि सध्याचे प्रशिक्षक मनीष झा यांचे लक्ष वेधून घेतले. 2022-23 मध्ये त्याला उत्तराखंडने व्हाईट-बॉल कर्णधार म्हणून नियुक्त केले होते.

ऋषभ पंत सोबत खास कनेक्शन

आकाश मधवाल आणि ऋषभ पंत हे दोघे प्रशिक्षक अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. पंत लहान वयातच दिल्लीला शिफ्ट झाला, त्यामुळे आकाश उत्तराखंडमधून आयपीएल खेळणारा पहिला क्रिकेटर बनला. तो रुरकीच्या धंदेरा भागातील आहे.

आकाश मधवालचा आयपीएल प्रवास

मधवाल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कॅम्पचा भाग होता, तो आरसीबीचा नेट बॉलर होता. 2022 च्या लिलावात तो विकला गेला गेला नाही. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या बदली म्हणून निवडले. नंतर एमआयने त्याला या हंगामासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news