MI vs LSG : मुंबईसमोर लखनौचे लोटांगण; आता मुकाबला गुजरातशी

MI vs LSG : मुंबईसमोर लखनौचे लोटांगण; आता मुकाबला गुजरातशी

चेन्नई; वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने बुधवारच्या एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंटस्चा 81 धावांनी धुव्वा उडवून अंतिम फेरीतील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. या दारुण पराभवामुळे लखनौचे आव्हान आटोपले आहे. आकाश मधवालच्या तिखटजाळमार्‍यापुढे त्यांची भंबेरी उडाली. आता मुंबईचा संघ क्वालिफायर -2 मध्ये गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 26 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन हात करणार आहे. (MI vs LSG)

मुंबईने लखनौपुढे विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, लखनौला ते पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ 16.3 षटकांत अवघ्या 101 धावांत गारद झाला. आकाश मधवालने 3.3 षटकांत अवघ्या 5 धावा देऊन लखनौचा निम्मा संघ तंबूत पाठवला. लखनौच्या फलंदाजांमध्ये जणू मैदानावर हजेरी लावण्याची स्पर्धा रंगली होती. कायले मेयर्स 18, प्रेरक मंकड 3, कर्णधार कृणाल पंड्या 8 हे त्रिकूट झटपट बाद झाले. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस (40) याने सामन्यात थोडीफार धुगधुगी आणली. आयुष बदोनी केवळ 1 धावा करून परतला. निकोलस पूरनला भोपळाही फोडता आला नाही. दीपक हुडाने 15 आणि रवी बिश्नोईने 3 धावा केल्या. कृष्णाप्पा गौतम 2 धावा करून धावबाद झाला. (MI vs LSG)

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अखेर त्यांनी निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा टोलवल्या. फलकावर केवळ 30 धावा लागलेल्या असताना वैयक्तिक 11 धावांवर रोहितने तंबूचा रस्ता धरला. पाठोपाठ भरवशाचा इशान किशनही 15 धावा करून बाद झाला. रोहितला यश ठाकूरने तर इशानला नवीन उल हकने टिपले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन (41) आणि सूर्यकुमार यादव (33) यांनी झकास फलंदाजी केली. हे दोघेही मुंबईला मोठी धावसंख्या गाठून देणार असे वाटत होते. तथापि, नवीन उल हकने पाठोपाठ या दोघांना बाद करून मुंबईला दणके दिले.

ग्रीनने 23 चेंडूंचा सामना करताना अर्धा डझन चौकार व एक षटकार ठोकला. यादवने 20 चेंडू खेळून दोन चौकार व दोन षटकार लगावले. मग तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड ही बिनीची जोडी मैदानात उतरली. मात्र, डेव्हिड फार काळ टिकू शकला नाही. वैयक्तिक 13 धावांवर तोही उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. तिलक वर्माने 26 धावांचे योगदान दिले. त्याने दोनदा चेंडू सीमारेषेच्या पार भिरकावला. नेहल वडेराने 12 चेंडूंत नाबाद 23 धावा फटकावल्यामुळे मुबंईच्या धावसंख्येला आकार आला. त्याने दोन षटकार व तेवढेच चौकार हाणले.

लखनौकडून नवीन उल हक सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 38 धावांच्या मोबदल्यात चौघा फलंदाजांना तंबूत पाठविले. त्याला सुरेख साथ दिली ती यश ठाकूर याने. 34 धावा मोजून यशने तीन गडी टिपले. मोहसीन खान याने एक गडी बाद केला. रवी बिश्नोई याने टिच्चून मारा करून आपल्या चार षटकांत फक्त 30 धावा दिल्या. ठरावीक अंतराने मुंबईचे गडी बाद होत गेल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news