Ravi Bopara : टी-20 सामन्यात त्सुनामी! ‘या’ संघाने केल्या 20 षटकांत 324 धावा

Ravi Bopara : टी-20 सामन्यात त्सुनामी! ‘या’ संघाने केल्या 20 षटकांत 324 धावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. इंग्लंडमध्ये दुसरी इलेव्हन टी-20 स्पर्धा सुरू आहे. ज्यात लंडनमध्ये ससेक्स सेकंड इलेव्हन आणि मिडलसेक्स सेकंड इलेव्हन यांच्यात 36 वा सामना खेळला गेला. यात ससेक्सचा कर्णधार 38 वर्षीय रवी बोपाराने (Ravi Bopara) बॉल आणि बॅटने कहर केला. रवीने 49 चेंडूंत पहिल्या 12 षटकार आणि 14 चौकारांसह 144 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये तीन षटकांत 4 विकेट घेत ससेक्सला 194 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

बोपाराकडून 12 षटकारांची आतषबाजी

लंडनमधील रिचमंड क्रिकेट क्लब मैदानावर ससेक्सचा कर्णधार बोपाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ससेक्सच्या 67 धावांवर दोन विकेट पडल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बोपाराने (Ravi Bopara) गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याने 49 चेंडूंत 14 चौकार आणि 12 षटकारांसह 144 धावांची शानदार खेळी साकारली. तर जॉर्ज गार्टेननेही 20 चेंडूंत सहा षटकार आणि दोन चौकारांसह 53 धावा फटकावल्या. दोघांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ससेक्सने टी-20 सामन्यात 7 विकेट गमावून 324 धावांचा डोंगर रचला. मिडलसेक्सकडून इशान कौशलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

मिडलसेक्स 130 धावांवर ऑलआऊट

325 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिडलसेक्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि 49 धावांवर त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर संघ या सुरुवातीच्या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि 130 धावांवर ऑलआऊट झाला. ससेक्ससाठी 144 धावा करणाऱ्या बोपाराने तीन षटकांच्या स्पेलमध्ये 32 धावांत चार बळी घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अशाप्रकारे, ससेक्सने टी-20 क्रिकेटमध्ये 194 धावांनी सर्वांत मोठा विजय नोंदवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news