

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli vs Gill : आयपीएल 2023 च्या हंगामात अनेक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात रिंकू सिंगचे सलग 5 षटकार मारून सामना जिंकणे असो किंवा महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजासारख्या दिग्गजांना शेवटच्या षटकात रोखणारा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा असो. अशा अनेक थरारक सामन्यांमधून आयपीएलच्या 16 व्या हंगामाने आता प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पण या सगळ्यात विराट कोहलीच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (RCB) विजेतेपद मिळवून देण्यासाठी कोहलीने या हंगामात आपली पूर्ण ताकद लावली. पण त्याचा संघ प्लेऑफ न गाठता साखळी फेरीतूनच बाहेर पडला.
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोहलीने जेव्हा-जेव्हा आपली ताकद दाखवली तेव्हा विरोधी संघ त्याच्या फटकेबाजीपुढे नतमस्तक झाला. पण या हंगामात एक असा खेळाडू होता ज्याने कोहलीला जोरदार टक्कर दिली आणि तो कोहलीपेक्षा कणभर वरचढ राहिला. त्या खेळाडूचे नाव आहे शुभमन गिल.
या संपूर्ण आयपीएल हंगामात 34 वर्षीय कोहली आणि 23 वर्षीय शुभमन गिल यांच्यात एक वेगळीच लढाई पाहायला मिळाली. हे दोन्ही खेळाडू कोणत्याही बाबतीत एकमेकांपेक्षा कमी दिसले नाही. कोहली हा भारतीय संघाचा वर्तमान आहे, तर गिल हे भविष्य आहे. कोहली आणि गिलच्या रूपाने या संपूर्ण आयपीएलमध्ये टीम इंडियाच्या वर्तमान आणि भविष्यात एक रंजक लढाई पाहायला मिळाली. (Kohli vs Gill)
सामने : 14
धावा : 639
सरासरी : 53.25
स्ट्राइक रेट : 139.82
शतके : 2
अर्धशतके : 6
चौकार : 65
षटकार : 16
सध्याच्या आयपीएल हंगामातील जवळपास सर्वच सामने उत्कंठावर्धक झाले असले, तरी ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना सर्वात दमदार झाल्याचे म्हणावे लागेल. हा सामना आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोहली आणि गिल यांच्यात म्हणजेच टीम इंडिया वर्तमान आणि भविष्यातील रंजक लढत पाहायला मिळाली.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावत 197 धावा केल्या. यादरम्यान कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेटही 165.57 होता. गुजरात संघाचे गोलंदाज कोहलीसमोर फारच फिके दिसत होते. आरसीबी हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते.
भारतीय संघाचे भविष्य मानला जाणारा शुभमन गिल गुजरातसाठी सलामीची आघाडी सांभाळत होता. मग काय, कोहलीप्रमाणे गिलनेही आपल्या संघाची सुरुवात तडफदार पद्धतीने केली. स्ट्राइक रेटच्या बाबतीत तर गिलने कोहलीला मागे टाकले. ज्या सामन्यात कोहलीने 165.57 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, तिथे गिलने 200 च्या स्ट्राइक रेटने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.
गिलने 8 षटकार आणि 5 चौकार मारले. तर कोहलीला फक्त एक षटकार आणि 13 चौकार मारता आले. गिल प्रत्येक बाबतीत कोहलीवर वरचढ दिसत होता. गुजरातला हा सामना जिंकून देण्यात गिलने मोलाचा वाटा उचलला. या स्टार सलामीवीराने 52 चेंडूत नाबाद 104 धावा करत गुजरात संघाला केवळ 19.1 षटकांत विजय मिळवून दिला. म्हणजे स्ट्राईक रेट असो किंवा मॅच जिंकण्याचा मुद्दा… प्रत्येक बाबतीत गिल कोहलीवर भारी पडल्याचे दिसते. (Kohli vs Gill)
सामने : 14
धावा : 680
सरासरी : 56.67
स्ट्राइक रेट : 152.46
शतके : 2
अर्धशतके : 4
चौकार : 67
षटकार : 22