विराट कोहलीसह सातजण लंडनच्या वाटेवर | पुढारी

विराट कोहलीसह सातजण लंडनच्या वाटेवर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएल 2023 मध्ये 70 सामने संपले असून चेन्नई, लखनौ, गुजरात आणि मुंबई हे चार संघ प्ले-ऑफमध्ये गेले आहेत. आता या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे पुढील लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलवर असणार आहे.

भारताला 7 जूनपासून ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा असून त्यासाठी भारतीय संघातील काही खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. मंगळवारी लंडनला रवाना होणार्‍या खेळाडूंमध्ये विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर. आश्विन यांचा समावेश आहे. आयपीएलमधील या खेळाडूंचा प्रवास आता संपला आहे.

दुसरीकडे रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 मे रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघदेखील त्याच्यासोबत जाईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत तीन नेट बॉलर्स जाणार असून त्यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे. भारतीय संघ सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती होते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील चुकीची पुनरावृत्ती न करता चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बीसीसीआय टीम इंडियाला सराव सामनाही खेळवण्याचा प्रयत्न करत आहे.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जूनदरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असेल, असे ट्विट त्यांनी केले. यासोबत टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलमध्ये याच नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. शहा म्हणाले की, ‘बीसीसीआयने किट प्रायोजक म्हणून आदिदास कंपनीशी करार केला आहे. क्रिकेटचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्टस्वेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.’

Back to top button