IPL 2023 Highlights : यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यातील १० हायलाईट्स | पुढारी

IPL 2023 Highlights : यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यातील १० हायलाईट्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या हंगामात अनेक रोमहर्षक सामने पहायला मिळाले. या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आयपीएलचा प्रत्येक हंगाम वेगवेगळ्या घटनांनी, विक्रमांनी लक्षात राहतो. दरम्यान २०२३ च्या हंगामात अनेक विक्रम झाले आणि वादही झाले. २०२३ चा हंगाम कोणत्या खेळाडूंनी गाजवला. दरम्यान, प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, प्लेऑफच्या सामन्यांपूर्वी लीग स्टेजपर्यंत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात… (IPL 2023 Highlights)

१. आयपीएल २०२३ मध्ये हॅरी ब्रुकने झळकावले पहिले शतक

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रुकने या हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याने या हंगामातील २३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरोधात शतकी खेळी केली. ब्रुकच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने २२८ धावांचा डोंगर उभा केला होता. ब्रुक हैदराबादकडून शतकी खेळी करणारा तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ने हैदराबादकडून शतक झळकावले होते. (IPL 2023 Highlights)

२. फॅफ डू प्लेसीसचे सर्वाधिक षटकार

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फॅफ डू प्लेसीस याने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याने १४ सामने खेळत ३६ षटकार लगावले आहेत. शिवाय आत्तापर्यंत आयपीएलच्या या हंगामात सर्वांधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने १४ सामने खेळत ७३० धावा केल्या आहेत. त्याने ५६.१५ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. दरम्यान, डू प्लेसीसने दमदार कामगिरी केली असली तरीही आरसीबीला प्लेऑफचे तिकिट मिळालेले नाही. (IPL 2023 Highlights)

३. यशस्वी जयस्वालने लगावले ८३ चौकार (IPL 2023 Highlights)

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने आयपीएलच्या या मौसमात सर्वाधिक चौकार लगावले आहेत. त्याने एकूण ८३ चौकार लगावले आहेत. जयस्वाल आयपीएलच्या या मौसमात राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने १४ सामने खेळत ४८ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत.

४. सध्या मोहम्मद शमीकडे आहे पर्पल कॅप

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे. त्याने १७ च्या सरासरीने २४ विकेट्स पटकावल्या आहेत. तर गुजरातचा फिरकीपटू राशिद खान यानेही २४ विकेट्सच पटकावल्या आहेत. मात्र, मोहम्मद शमीचा इकॉनॉमी रेट राशिद खानपेक्षा चांगला असल्याने पर्पल कॅप शमीकडे आहे. शमीने एकूण ५५ षटक टाकली. यामध्ये ४२४ धावा देत त्याने २४ विकेट्स घेतल्या.

५. ऋतुराज गायकवाडने पकडले सर्वाधिक झेल

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवर ऋतुराज गायकवाड याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडले आहेत. त्याने एकूण १४ सामने खेळत १५ झेल पकडले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने एकूण १३ झेल घेतले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार अॅडन मार्करम आहे. त्याने ११ झेल पडकण्याची कामगिरी केली आहे.

६. विराट आणि नवीन चा वाद

लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्‍यात ४ मे रोजी सामना झाला होता. या सामन्‍यावेळी नवीन-उल-हक हा विराट कोहलीशी भिडला होता. नवीन फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यात काही संवाद झाला. पंचांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण नवीन थांबत नव्हता. मॅचनंतर हे प्रकरण आणखी वाढले, हातवारे करत विराट आणि नवीनमध्ये बाचाबाची झाली. यानंतर प्रकरण इथेच संपले नाही तर नवीनमुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही वादावादी झाल्‍याचे पाहायला मिळाले होते.

७. विराट आणि गोतम गंभीर आमने-सामने (IPL 2023 Highlights)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धेत सोमवारी ( दि. १ ) लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांच्यातील सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. या सामन्‍यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्‍ये झालेला वाद सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली आहेस…(IPL 2023 Highlights)

प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, “विराट कोहली याने मेयर्सवर टिप्पणी केली. याची दखल गौतम गंभीर याने घेतली. त्‍याने विराटच्‍या दिशेने चाल केली. यावेळी त्‍याला मेयर्सने आपल्या बाजूने खेचले. यावेळी गंभीर याने कोहलीला विचारले की. तू काय बोलत आहेस? यावर मी तुझ्‍याबद्‍दल काहीच बोलत नाही. तू वाद स्‍वत:वर का ओढावून घेत आहेत, असा सवाल विराटने केला. यावर गंभीरने उत्तर दिले की, “तू माझ्या खेळाडूशी बोलला आहेस, म्हणजे तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली आहेस; यावर विराट प्रत्‍युत्तर दिले की, ‘तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.’ यावेळी अमित मिश्रासह इतर खेळाडूंनी मध्‍यस्‍ती करत हा वाद थांवला होता. (IPL 2023 Highlights)

८. राशिद खानची हॅटट्रीक (IPL 2023 Highlights)

आयपीएल २०२३ मधील पहिली हॅटट्रिक गुजरात टायटन्सच्या राशिद खानने केली. त्‍याने केकेआर विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. गुजरातने कोलकाता समोर २०५ धावांचे आव्हान ठेवले. यानंतर शेवटच्या ५ षटकांमध्ये ६० धावांची गरज असताना आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण क्रिजवर होते. राशिद खानने १७ व्या षटकात आपल्या फिरकीची जादू चालवली आणि हॅटट्रीक पटकावली.

९. केएल राहुल, विल्यमसन दुखापत झाल्याने आयपीएलमधून आऊट

केन विल्यमसन यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात झेल पकडताना जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. त्याबरोबरच आगामी वनडे विश्वचषकातूनही तो बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवाय, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलमधून बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याच्या अनुपस्थितीमध्ये कृणाल पंड्या लखनौ संघाचे नेतृत्व करणार आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मार्कस स्टोयनिसच्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने कव्हर ड्राईव्ह मारला होता. तेव्हा राहुलला चौकार रोखताना दुखापत झाली. (IPL 2023 Highlights)

१०. अनेक सामने झाले रोमहर्षक

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अनेक सामने २० व्या षटकापर्यंत गेले. अनेक संघांनी अंतिम षटकात विजय मिळवला. तर काहींनी अंतिम सामन्यात विजय खेचून आणला. इप्मॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे शेवटच्या षटकापर्यंत सामना जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

११, रिंकू सिंगने सलग ५ षटकार लगावत केकेआरला मिळवून दिला विजय

युवा खेळाडू रिंकू सिंग याने गुजरात विरुद्धच्या सामन्यात सलग ५ षटकार लगावत केकेआरला विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने आयपीएलच्या या हंगामात अनेक सामने स्वत:च्या दमदार कामगिरीवर खेचून आणले. यश दयालच्या षटकात त्याने सलग ५ षटकार लगावत केकआरला विजय मिळवून दिला.  (IPL 2023 Highlights)

हेही वाचलंत का?

Back to top button