Virat Kohli : विराटचे शतक एक… विक्रम अनेक..! | पुढारी

Virat Kohli : विराटचे शतक एक... विक्रम अनेक..!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयपीएल 2023 मध्ये झालेल्या 65 व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायजर्स हैदराबादचा 8 विकेटस्नी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबादने बेंगलोरला 187 धावांचे टार्गेट दिले होते. सलामीवीर विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आरसीबीने शानदार विजय साकारला. सामन्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो विराट कोहलीचे स्फोटक शतक होय. (Virat Kohli)

विराट कोहलीने 63 चेंडूंत 100 धावा केल्या, यात 4 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. आयपीएलमध्ये चार वर्षांनंतर विराटने शतक झळकावले आहे. याआधी त्याने 2019 मध्ये शतक केले होते. या शतकासह विराटने स्पर्धेत सर्वाधिक शतक करणार्‍या यादीत स्थान मिळवले आहे. याशिवाय विराटने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. (Virat Kohli)

हैदराबादविरुद्ध धावांचा पाठलाग करताना दुसर्‍या डावात विराटने शतक केले. धावांचा पाठलाग करताना शतक करण्याची विराटची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्याने 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंटस् संघाविरुद्ध दुसर्‍या डावात 58 चेंडूंत 108 धावा केल्या होत्या.

आरसीबीकडून सलामीवीर म्हणून दोन शतके करणारा विराट हा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी देवदत्त पडिक्कल, पॉल वाल्थाटी, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांनी धावांचा पाठलाग करताना शतक केले होते.

विराट आणि आरसीबी यांचे नाते 2008 पासूनचे आहे. 2016 मध्ये त्याने एका हंगामात 4 शतके केली होती. 2019 मध्ये पाचवे शतक तर आता सहावे शतक केले. आयपीएलमध्ये एका संघाकडून कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वाधिक शतके ठरली आहेत. याआधी हा विक्रम गेलच्या नावावर होता. त्याने आरसीबीकडून पाच शतके केली होती.

कसोटी, वन डे क्रिकेटमध्ये शतकांचा विक्रम करणारा विराट आता टी-20 मध्ये देखील किंग झाला आहे. टी-20 मधील त्याच्या शतकांची संख्या 7 झाली आहे. भारताच्या एकाही खेळाडूला टी-20 मध्ये इतकी शतके करता आली नाहीत. आयपीएलमधील 6 शतकांसोबत आशिया कप 2022 मध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतक केले होते. हैदराबादविरुद्धच्या शतकासह त्याने रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांना मागे टाकले, या दोघांच्या नावावर टी-20 मध्ये प्रत्येकी 6 शतके आहेत.

विराट बॉम्ब आहे… अनुष्का

शतकी खेळी आणि मोठ्या फरकाने विजय मिळाल्यानंतर किंग कोहलीने जल्लोष केला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा गुरुवारचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित नव्हती, पण बॉलीवूड अभिनेत्रीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या पतीच्या खेळीचे कौतुक केले. ‘विरुष्का’ने मैदानातच व्हिडीओ कॉल केला. अनुष्काने विराटच्या शतकाचे कौतुक करताना इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली. यामध्ये विराट हा बॉम्ब आहे… असे इमोजीच्या माध्यमातून म्हटले आहे.

मी कधीच भूतकाळातील आकड्यांकडे पाहत नाही. मी आधीच खूप तणावाखाली आहे. प्रभावी शॉटस् खेळूनही मी स्वतःला कधी-कधी पुरेसे श्रेय देत नाही. (म्हणून) बाहेरून कोणी काय म्हणेल याची मला पर्वा नाही. कारण ते त्यांचे मत आहे, असे म्हटले होते.

– विराट कोहली

विराट जेव्हा पहिला कव्हर ड्राईव्ह खेळला तेव्हा पहिल्याच चेंडूपासून हा दिवस विराटचा असेल हे स्पष्ट झाले. विराट आणि फाफ दोघेही संपूर्ण नियंत्रणात दिसत होते, त्यांनी अनेक मोठे शॉटस् खेळले, पण त्याहीपेक्षा यशस्वी भागीदारी करण्यासाठी विकेटस्च्या दरम्यान ताळमेळ उत्तम राखला होता. दोघांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी 186 ही मोठी धावसंख्या नव्हती.

– सचिन तेंडुलकर

 

हेही वाचा;

Back to top button