लक्ष्मण याने एनसीएमधील द्रविडची जागा घेण्यास नकार | पुढारी

लक्ष्मण याने एनसीएमधील द्रविडची जागा घेण्यास नकार

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे (एनसीए) प्रमुख होण्यास नकार दिला आहे. राहुल द्रविड सध्या एनसीएचा प्रमुख आहे; पण द्रविड टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघात मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळेल. त्यानंतर एनसीएचे प्रमुखपद रिक्त होणार आहे. याच कारणामुळे ही जबाबदारी लक्ष्मणला देण्याचा निर्णय घेण्यात आला होत.

मात्र, त्याने ती नाकारली आहे. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने लक्ष्मणशी याप्रकरणी संपर्क साधला होता; पण त्याने यात रस दाखवला नाही. द्रविडप्रमाणे, लक्ष्मण देखील त्याच्या काळातील एक महान फलंदाज होता. या दोन खेळाडूंची 2001 च्या कोलकाता कसोटी सामन्यातील भागीदारीबद्दल आठवण काढली जाते. यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद रिक्त होईल.

रवी शास्त्रींबरोबरच कोचिंग स्टाफची इतर पदेही रिक्त होतील आणि यानंतर राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. मात्र, औपचारिकता म्हणून बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत.

मुख्य प्रशिक्षकाव्यतिरिक्त फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. इतर पदांसाठी शेवटची तारीख 3 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.

Back to top button