देशांतर्गत क्रिकेटमधील भन्नाट फॉर्म यशस्वीच्या यशाचे गुपित | पुढारी

देशांतर्गत क्रिकेटमधील भन्नाट फॉर्म यशस्वीच्या यशाचे गुपित

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : रणजी क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमधील भन्नाट फॉर्म हेच मुंबईकर फलंदाज यशस्वी जैस्वालच्या आयपीएलमधील उंचावलेल्या कामगिरीचे गुपित असल्याचे त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी म्हटले आहे.

मुंबई क्रिकेटला फलंदाजांची खाण म्हटले जाते. यशस्वी हा त्यातील एक फाईंड आहे. आयपीएलमुळे त्याने केवळ भारतीय संघाचे दरवाजे उघडले नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार खेळीने यशस्वीचा आत्मविश्वास उंचावला आहे. सलामीवीर म्हणून फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचे सोने केले, असे ज्वाला सिंग म्हणाले.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालची बॅट चांगलीच तळपली. इराणी चषक स्पर्धेमध्ये शेष भारत संघातर्फे खेळताना त्याने दोन्ही डावांमध्ये शतके (213 आणि 144 धावा) ठोकली. त्यापूर्वी, 2022 मधील रणजी करंडकही गाजवला. मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरी उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्ध (103 धावा) आणि उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध दोन्ही डावांतील शतके (100, 181 धावा) झळकावत छाप पाडली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना यशस्वीने 12 सामन्यांत 575 धावा फटकावल्या आहेत. त्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शतकाचा (124 धावा) समावेश आहे. याशिवाय त्याच्या नावावर चार अर्धशतकेही आहेत.

माझ्यात आणि यशस्वीमध्ये पिता-पुत्राचे नाते आहे. प्रशिक्षण दिलेला प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावा, हे माझे व्हिजन आहे. 2013 मध्ये यशस्वीला मी आझाद मैदानावर पहिल्यांदा खेळताना पाहिले. तो क्रिकेटसाठी त्याच्या गावाहून (सुरिया-उत्तर प्रदेश) पळून आल्याचे मला माझ्या मित्राने सांगितले. हॅरिस शील्डमधील अष्टपैलू कामगिरीतून यशस्वीच्या खेळाची मला कल्पना आली. त्याला संपूर्ण मदत आणि सहकार्य देण्याचे मी ठरवले. आपल्या मुलाला स्टार क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न असल्याचे यशस्वीच्या वडिलांशी (भूपेंद्रकुमार) बोलताना जाणवले. मात्र, तुम्ही माझ्या मुलाला तुम्हाला हवे तसे बनवा. त्याला असे सांगत माझ्याकडे सुपूर्द केले, असे ज्वाला यांनी सांगितले.

यशस्वीला चांगला क्रिकेटपटू बनवण्यासाठी ज्वाला यांनी खूप मेहनत घेतली. फलंदाजीतील महत्त्वपूर्ण टिप्ससाठी त्यांचे मित्र आणि माजी कसोटीपटू वासिम जाफर याच्याशी त्याची भेट घालून दिली. बारीक गुडघे हे यशस्वीसाठी शारीरिक तंदुरुस्तीसाठी अडचणीचे ठरत होते. मात्र, ज्वाला यांनी डॉक्टरांशी चर्चा करून फिजिओथेरपी आणि सरावाद्वारे त्यावर उपचार केले.

आयपीएलमधील कामगिरी :
12 सामन्यांत 575 धावा
एक शतक (124 धावा-वि. मुंबई) आणि चार अर्धशतके

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी :

इराणी चषक : शेष भारत संघातर्फे दोन्ही डावांमध्ये (213 आणि 144 धावा) शतके

रणजी करंडक : 2022 रणजी हंगामात सलग तीन डावांमध्ये (103, 100, 181 धावा) शतक. उपांत्य फेरीतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या दोन्ही डावांतील शतकांचा समावेश.

Back to top button