IPL 2023 : प्रेरक बनला लखनौचा तारक | पुढारी

IPL 2023 : प्रेरक बनला लखनौचा तारक

हैदराबाद, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही भारतीय क्रिकेटला हिरे शोधून देणारी खाण आहे. आजच्या भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे मोजकेच एक-दोन खेळाडू सोडले तर सगळे खेळाडू हे आयपीएलमधून पुढे आले आहेत. आयपीएलला कोणीही कितीही नाक मुरडले तरी भारतासाठी ही लीग फायदेशीरच ठरली आहे. दरवर्षी नवनवीन तारे भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर चमकू लागतात. शनिवारी (IPL 2023) अशीच दोन नावे अचानक स्टार बनून गेली. यातील एक होता पंजाब किंग्जचा प्रभसिमरन सिंग तर दुसरा आहे लखनौ सुपर जायंटस्चा प्रेरक मंकड.

2023 चा 58 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात 13 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौने हैदराबादचा घरच्या मैदानावर संघाचा 7 विकेटस्ने पराभव केला. सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली की, जेव्हा असे वाटत होते की हैदराबादचा संघ हा सामना सहज जिंकेल; पण मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांच्या वेगवान फलंदाजीने हे होऊ दिले नाही, पण संघाच्या विजयाचा पाया रचणारा मात्र वेगळाच फलंदाज होता. भारतीय अनकॅप्ड खेळाडू प्रेरक मंकडने आपल्या फलंदाजीने दहशत निर्माण केली. आपल्या अप्रतिम फलंदाजीने हैदराबादच्या गोलंदाजांना समोर टिकू दिले नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेरक मंकड लखनौ सुपर जायंटस्कडून पहिला सामना खेळत होता. लिलावादरम्यान लखनौने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले. मंकडने पहिल्या सामन्यात अजिबात निराश केले नाही आणि लखनौ पराभूत होत असलेल्या सामन्यात संघाच्या विजयाचा पाया रचला. हा सामना जिंकण्यासाठी त्याची खेळी खूप महत्त्वाची ठरली. 142 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणार्‍या प्रेरक मंकडने 45 चेंडूंत 64 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 2 षटकारही पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर या सामन्यात तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. आयपीएल 2022 मध्ये प्रेरकला पंजाब किंग्जच्या संघाने 20 लाख रुपयांना संघात घेतले होते.

प्रेरक मंकडचा जन्म 23 मार्च 1994 रोजी राजस्थानच्या सिरोही येथे झाला. त्याचा जन्म राजस्थानमधील असला तरी तो सौराष्ट्रकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने 24 फेब्रुवारी 2016 रोजी 2015-16 रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रथम श्रेणी पदार्पण केले. दुसरीकडे, प्रेरकने 25 फेब्रुवारी 2017 रोजी 2016-17 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले. प्रेरक हा अष्टपैलू खेळाडू असून तो फलंदाजीसोबतच उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाजही आहे.

त्याने 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2006 धावा केल्या आहेत तसेच 43 विकेटस् घेतल्या आहेत. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रेरकने 53 सामन्यांत 1535 धावा केल्या आहेत आणि 38 विकेटस् घेतल्या आहेत. तर आयपीएल व्यतिरिक्त, मंकडने 43 टी-20 सामन्यांमध्ये 142 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 877 धावा केल्या आहेत आणि 22 विकेटस् देखील घेतल्या आहेत.

प्रेक्षकांच्या गोंधळात प्रेरक जखमी

सनरायजर्स हैदराबादच्या इनिंगदरम्यान अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे बराच वेळ सामना थांबवावा लागला होता हे तुम्हाला आठवत असेल. तिसर्‍या पंचाने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध निर्णय दिल्याने चाहते संतप्त झाले. लखनौ सुपर जायटंस्च्या डगआऊटजवळ बराच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. लखनौच्या डगआऊटच्या दिशेने प्रेक्षकांनी काही वस्तू खाली फेकल्या, ज्याच्यामध्ये नट बोल्टसचा समावेश होता.

लखनौचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी र्‍होडस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, प्रेक्षकांनी फेकलेले नट आणि बोल्ट लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणार्‍या प्रेरक मंकडच्या डोक्याला लागले होते. र्‍होडसने ट्विटरवर लिहिले – डगआऊटवर नाही, तर खेळाडूंवर. मंकड लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या डोक्याला लागले. या जखमेतून प्रेरणा घेऊनच प्रेरक बनला लखनौचा तारक.

Back to top button