Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची ‘या’ दिवशी होईल टीम इंडियात एन्ट्री, शास्त्री गुरुजींची भविष्यवाणी | पुढारी

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची ‘या’ दिवशी होईल टीम इंडियात एन्ट्री, शास्त्री गुरुजींची भविष्यवाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) आयपीएलमध्ये (IPL 2023) सर्वात जलद अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने गुरुवारी, 11 मे रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) 47 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 98 धावा फटकावल्या. या झंझावाती खेळीदरम्यान जैस्वालने 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे.

चाहत्यासह क्रिकेट तज्ज्ञ जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) खेळीचे दिवाणे झाले आहेत. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या युवा फलंदाजावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जैस्वाल लवकरच भारतीय संघात एंट्री घेण्यात ‘यशस्वी’ होईल, अशी भविष्यवाणी शास्त्री गुरुजींनी केली आहे.

क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री (Ravi Shastri) पुढे म्हणाले की, ‘यशस्वी जैस्वालची ज्यांनी-ज्यांनी फलंदाजी पाहिली आहे, ते एकाच आवाजात त्याच्यावर स्तुती सुमने उधळत आहेत. या डावखु-या सलामीवीराचे ऑफ-साइडच्या दिशेने मारलेले फटके अप्रतिम होते. यावेळी त्याने डोके अचूक आणि स्थिर ठवेले, जे क्लासिक फलंदाजाचे लक्षण आहे. त्याच्या फूटवर्कमध्येही कसलीच कमतरता नाही. तो फक्त 21 वर्षांचा आहे आणि खडतर प्रवास करून त्याने हे स्थान गाठले आहे.’

शास्त्री (Ravi Shastri) पुढे म्हणाले, ‘टीम इंडिया जर वनडे वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करत असेल, तर निवडकर्त्यांनी यशस्वी (Yashasvi Jaiswal) आणि रिंकूसारख्या (Rinku Singh) तरुणांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्यांना तयार केले जाऊ शकते. जर निवडकर्त्यांनी त्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष केले तर त्यांना आणखी काय शोधायचे आहे, असा प्रश्न निर्माण होईल.’

हार्दिक नेतृत्व करेल

प्रत्येकजण खेळण्यासाठी पात्र होऊ शकतो, परंतु मला वाटते की हार्दिक नेतृत्व करेल. तो आधीच टी-20 मध्ये स्टँडबाय कर्णधार आहे त्यामुळे त्याला फिटनेसची समस्या नसल्यास त्याच्याकडे कायमचे कर्णधार पद देण्यास हरकत नाही. मला वाटते की निवडकर्ते नव्या दिशेने पाहतील. नव्या दमाच्या तरुणांमध्ये खूप प्रतिभा आहे. टीम इंडियाची नव्याने बांधणी करण्याची चांगली संधी आहे. शेवटच्या काही सिनिअर खेळाडूंसह आतापासून नव्या चेह-यांना आंतरराष्ट्रीय मैदानात उतरवणे फायद्याचे ठरेल, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचा असा विश्वास आहे की, जैस्वाल राष्ट्रीय निवडकर्त्यांना त्याची प्रतिभा दाखवून त्याला भारतीय संघात घेण्यास भाग पाडत आहे. तो केवळ भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे ठोठावत नाही, तर तो त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने ते मोडून काढत आहे.’

हरभजन सिंग म्हणाला, ‘यशस्वीने आयपीएलमध्ये देशांतर्गत क्रिकेटचा उत्कृष्ट फॉर्म पुढे नेला. तो किती प्रतिभावान आहे! भारतीय क्रिकेटचे भविष्य चांगल्या खेळाडूंच्या हातात आहे. टीम इंडियाच्या टी-20 संघात जैस्वाल आणि रिंकू सिंग सारख्या युवा प्रतिभांचा समावेश करण्याची वेळ आली आहे.’

Back to top button