IPL 2023 : असे असेल प्ले-ऑफचे गणित!

IPL 2023 : असे असेल प्ले-ऑफचे गणित!
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएल हंगामात आता शेवटचे केवळ 15-16 सामनेच बाकी आहेत. पण, यानंतरही आश्चर्य म्हणजे सर्वच्या सर्व 10 संघांना सांख्यिकीद़ृष्ट्या प्ले- ऑफसाठी संधी असणार आहे. 10 संघांची सद्यस्थिती कशी आहे, यावर हा थोडक्यात द़ृष्टिक्षेप…

गुजरात टायटन्स : या संघाने 16 गुणांसह आपले अव्वलस्थान कायम राखले असून त्यांचा प्ले-ऑफमधील सहभाग जवळपास निश्चित आहे. उर्वरित सामन्यांत ओळीने पराभव पत्करावे लागले तरी हा संघ जास्तीत जास्त संयुक्त तिसर्‍या स्थानी फेकला जाऊ शकतो आणि यानंतरही त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान अबाधित असेल.

चेन्नई सुपर किंग्ज : संयुक्त स्थानासह किंवा एककलमी आघाडीसह धोनीसेनाही प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, असे सध्याचे चित्र आहे. धोनीचे कल्पक नेतृत्व या संघासाठी अंतिम टप्प्यात निर्णायक ठरू शकते. समतोल संघ हे त्यांचे बलस्थान आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ एकवेळ आठव्या स्थानी होता. पण, मंगळवारी मिळवलेल्या विजयानंतर ते पहिल्या चारमध्ये मुसंडी मारण्यात यशस्वी झाले. केवळ एका विजयाने किती फेरफार होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण होते.

लखनौ सुपर जायंटस् : पहिले चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. या निकषावर लखनौला शक्य तितके विजय मिळवून स्थान निश्चित करण्याच्या द़ृष्टीने दक्ष राहावे लागेल. संयुक्त बरोबरीची कोंडी कायम राहिल्यास धावसरासरीचा निकष लागू शकतो.

राजस्थान रॉयल्स : दोन किंवा त्याहून अधिक संघ संयुक्त चौथ्या स्थानी राहिले तर याचा कोणत्याही संघाला फटका बसू शकतो. राजस्थानच्या खात्यावर 11 सामन्यांत 10 गुण असून उर्वरित 3 सामन्यांत शक्य तितके विजय मिळवण्यावर या संघाला भर द्यावा लागेल.

केकेआर : पहिल्या चारमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी अंतिम टप्प्यात हा संघ देखील अनुभव पणाला लावेल. राजस्थानच्या तुलनेत या संघाची धावसरासरी अधिक सरस असून गुणांची कोंडी कायम राहिली तर या निकषाचा त्यांना लाभ होऊ शकतो.

पंजाब किंग्ज : सोमवारी केकेआरविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर या संघाला धक्का सोसावा लागला असून पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागेल. उर्वरित 3 सामन्यांत त्यांना दोन विजयांची अपेक्षा करावी लागणार आहे.

आरसीबी : मुंबई इंडियन्सकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर आरसीबीच्या आशा-अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, अद्याप हा संघ देखील प्ले-ऑफसाठी स्थान निश्चित करण्यासाठी सक्षम आहे. आरसीबीचेही आणखी 3 सामने बाकी आहेत.

सनरायजर्स हैदराबाद : तूर्तास हा संघ नवव्या स्थानी असला तरी उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते संयुक्त अव्वल स्थानापर्यंतही झेप घेऊ शकतात. हैदराबादचे 4 सामने बाकी असून याचा त्यांना लाभ होऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्स : या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी दिल्लीला देखील अद्याप प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याची अपेक्षा आहे. उर्वरित सर्व सामने जिंकून समीकरणांची उलथापालथ करण्याचा या संघाचा निश्चितपणाने प्रयत्न असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news