Virat Kohli Record : कोहलीच्या नावावर ‘विराट’ विक्रम! IPL मध्ये 7000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज | पुढारी

Virat Kohli Record : कोहलीच्या नावावर ‘विराट’ विक्रम! IPL मध्ये 7000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : यंदाच्या आयपीएलमधील 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) विराट कोहलीच्या आरसीबीचा धुव्वा उडवून धमाकेदार विजय नोंदवला. मात्र या पराभवातही विराटची बॅट तळपली. त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 55 धावांची शानदार खेळी केली. तसेच त्याचे आयपीएलमधील 50 वे अर्धशतक होते. विराटच्या या शानदार खेळीमुळे आरसीबीने या सामन्यात 181 धावा केल्या. सामना संपल्यानंतर त्याने आपल्या यशस्वी खेळीचे श्रेय प्रशिक्षक आणि पत्नीला दिले. (Virat Kohli Record)

सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि फॅफ आरसीबीसाठी सलामीसाठी मैदानात आले आणि दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. विराटने दुसऱ्या षटकात अक्षर पटेलच्या चौथ्या चेंडूवर चौकार ठोकत 12 धावा पूर्ण केल्या. या 12 धावांसह त्याने तो आयपीएलच्या इतिहासात 7 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 212 डावात 6536 धावा केल्या आहेत. याशिवाय डेव्हिड वॉर्नर 6189 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मा 6063 धावांसह चौथ्या क्रमांकावर आणि सुरेश रैना 5528 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. (Virat Kohli Record)

विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्माही सामना पाहण्यासाठी आले होते. सामन्यापूर्वी त्याने प्रशिक्षकाची भेट घेतली आणि त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यानंतर त्याने आयपीएलमध्ये 50 अर्धशतके आणि 7000 धावा पूर्ण केल्या.

विराट कोहलीची प्रतिक्रिया

विराट म्हणाला, ‘आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण करणे हा प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड आहे. हा माझ्यासाठी एक खास क्षण आहे. माझा संपूर्ण प्रवास येथून सुरू झाला. याच मैदानावर निवडकर्त्यांनी माझी दखल घेतली आणि माझी निवड झाली. मी सर्वांचा आभारी आहे. देवाने अशा आश्चर्यकारक गोष्टींनी मला आशीर्वादित केले, मी फक्त नतमस्तक होऊ शकतो. मी पहिल्या दिवसापासून नेहमी म्हणत आलो आहे की, दौऱ्यावर अनुष्का सोबत असणे ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कौटुंबिक वेळ इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचा आहे. जेव्हा अनुष्का मला स्टेडियमवर भेटायला येते तेव्हा खूप छान वाटते. भाऊ आणि बहिणी इथे आहेत आणि त्यांची कुटुंबेही इथे आहेत. हे अविश्वसनीय आहे.’

विराटचा घरच्या मैदानावर विक्रम (Virat Kohli Record)

विराटने 2008 मध्ये आरसीबीसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो या संघाचा एक भाग आहे. आयपीएलमधील 233 सामन्यांमdhye त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 50 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली आहेत. 2016 मध्ये त्याने ऑरेंज कॅपही जिंकली होती. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक 973 धावा करणारा तो फलंदाज आहे.

Back to top button