Chennai : सीएसकेने विजयी 'चौकारा'चे सोने लुटले | पुढारी

Chennai : सीएसकेने विजयी 'चौकारा'चे सोने लुटले

दुबई : पुढारी ऑनलाईन

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ( Chennai vs Kolkata ) २७  धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलवर आपले नाव कोरले. सीएसकेने केकेआरसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. सीएसकेकडून ड्युप्लेसिसने ५९ चेंडूत ८६ धावांची दमदार खेळी केली. त्याला मोईन अलीने ३७ धावा करुन चांगली साथ दिली. ऋतुराज गायकवाड ३२ तर रॉबिन उथप्पाने ३१ धावांचे योगदान दिले.

१९३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरेल्या केकेआरने ९१ धावांची सलामी दिली. मात्र व्यंकटेश अय्यर ( ५० ) आणि शुभमन गिल ( ५१ ) बाद झाल्यानंतर केकेआरची मधली फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अखेर केकेआरचा डाव २० षटकात ९ बाद १६५ धावात आटोपला. सीएसकेकडून शार्दुल ठाकूरने ३८ धावात ३ विकेट घेत सामना पालटला.

केकेआरच्या सालामीवीरांचे चोख प्रत्युत्तर 

केकेआरच्या सलामीवीरांनी ९१ धावांची आक्रमक सलामी देत सीएसकेचे टेन्शन वाढले होते. मात्र शार्दुल ठाकूरने आपले जोडी ब्रेकर बिरुदावली कायम राखत ही जोडी फोडली आणि केकेआरची गळती सुरु झाली.

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने ( Chennai vs Kolkata ) दमदार सुरुवात केली. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये ५० धावा केल्या होत्या तर केकेआरच्या व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये ५६ धावा ठोकल्या.

व्यंकटेश अय्यरने हेजवलूडच्या गोलंदाजीवर खुद्द धोनीने दिलेल्या जीवनदानाचा फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान, शुभमन गिलनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यालाही नशिबाने चांगली साथ दिली. जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जो रायडूकडे झेलबाद झाला होता. मात्र चेंडू स्पायड कॅमच्या केबलला लागल्याने तो चेंडू डेड बॉल ठरवण्यात आला.

शार्दुलने सामन्याचे चित्र पालटले ( Chennai vs Kolkata )

केकेआरच्या या जमलेल्या सलामी जोडीने १० षटकात ९१ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. मात्र ही जोडी जोडी ब्रेकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने व्यंकटेश अय्यरला ५० धावांवर बाद केले. त्यानंतर शार्दुलने त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नितीश राणालाही शुन्यावर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सामन्यावर पुन्हा आपले वर्चस्व मिळवणाऱ्या सीएसकेने अजून एक धक्का  केकेआरला दिला. जॉस हेजलवूडने सुनिल नारायणला २ धावांवर बाद करत केकेआरला तिसरा धक्का दिला. एका बाजूने केकेआरची वाताहत होत असताना दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने आपले अर्धशतक ४० चेंडूत पूर्ण केले. मात्र गिलला या अर्धशतकी खेळीचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. त्याला ५१ धावांवर दीपक चाहरने बाद केले.

केकेआरने पराभव स्विकारला

गिल बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक ९ तर शाकिब अल हसन शुन्य धावांची भर घालून माघारी परतले. पाठोपाठ विकेट गेल्याने केकेआरची धावगती मंदावली त्यामुळे सामनाही हातातून निसटू लागला. दुखापतग्रस्त राहुल त्रिपाठीही २ धावांचेच योगदान देऊ शकला. केकेआरची अवस्था १ बाद ९१ वरून १६ षटकात ७ बाद १२५ धावा अशी झाली.

केकेआरचा कर्णधार मॉर्गननेही ४ धावांचे योगदान देऊन पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर आलेल्या शिवम मावी ( २० ) आणि लोकी फर्ग्युसनने ( १७) काही आकर्षक फटके मारले मात्र सामना केकेआरच्या हातातून गेला होता. अखेर केकेआरचा डाव २० षटकात ९ बाद १६५ धावांवर संपला.

हेही वाचा : शाहरुख आज आयपीएल फायनल बघायला जाणार की नाही?

सीएसकेची दमदार सुरुवात ( Chennai vs Kolkata )

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ( Chennai vs Kolkata ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. पॉवर प्लेमध्ये ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी केली.

 पॉवर प्ले संपल्यानंतर फाफ ड्युप्लेसिसनेही आपली धावांची गती वाढवली. मात्र हा ८ षटकात ६१ धावांची सलामी देणारी जोडी सुनिल नारायणने फोडली. त्याने ऋतुराजला ३२ धावांवर बाद केले. ऋतुराज बाद झाल्यानंतर ड्युप्लेसिस आणि नुकताचा खेळपट्टीवर आलेल्या रॉबिन उथप्पाने आक्रमक फलंदाजी कायम ठेवत सीएसकेला १० षटकात ८० धावांपर्यंत मजल मारुन दिली.

ड्युप्लेसिसची मोठी खेळी

दरम्यान, फाफ ड्युप्लेसिस आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने लोकी फर्ग्युसनला षटकार मारत ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ड्युप्लेसिस आणि उथप्पाने केलल्या आक्रमक भागीदारीमुळे सीएसकेने १२ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. या दोघांनी २६ चेंडूत नाबाद ५१ धावांची भागीदारी रचली.

ही जोडी केकेआरची चांगलीच डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच नारायणने पुन्हा एकदा सीएसकेला धक्का दिला. १५ चेंडूत ३१ धावांची आक्रमक खेळी करणारा उथप्पा पायचित झाला. उथप्पा बाद झाल्यानंतर काही षटके चेन्नईची धावगती मंदावली. मात्र त्यानंतर मोईन अलीने १७ व्या षटकात दोन षटकार मारत सीएसकेच्या १५० धावा धावफलकावर लावल्या.

त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी ( ६८ ) भागीदारी केली. अखेर ड्युप्लेसिस अखेरच्या षटकात ५६ चेंडूत ८६ धावा करुन बाद झाला. त्याबरोबरच चेन्नईचा डाव २० षटकात ३ बाद १९२ धावांवर आटोपला.

Back to top button