

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lionel Messi vs PSG : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेस्सी पॅरिस सेंट जर्मेन म्हणजेच पीएसजी सोडण्याच्या तयारीत आहे. मेस्सीचा फ्रेंच क्लब सोबतचा करार यावर्षी जूनमध्ये संपणार आहे. त्यानंतर मेस्सी पीएसजीला सोडचिठ्ठी देऊन ख्रितियानो रोनाल्डोप्रमाणे सौदी अरेबियाची वाट धरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या बातमीनंतर फुटबॉल विश्वात जणू भूकंपच झाला आहे. नुकतेच पीएसजी क्लबने (PSG Club) मेस्सीचे निलंबन केल्याचे समोर आले आहे. परवानगीशिवाय सौदी अरेबियाला प्रवास केल्यामुळे मेस्सीवर कारवाई करण्यात आली. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी त्याला क्लबच्या कुठल्याही खेळाडूसोबत सराव करणे तसेच क्लबच्या मैदानावर उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याच्या वेतनातून कपात केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर मेस्सी (Lionel Messi) आणि पीएसजी क्लब व्यवस्थापनामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. आपल्यावरील कारवाईने अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलर दु:खी झाला असून तो वेगळा विचार करत आहे, अशी शक्यता त्याच्या जवळच्यांनी व्यक्त केली आहे. (Lionel Messi vs PSG)
दरम्यान, 'द टेलिग्राफ' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबने मेस्सीला वार्षिक 3300 कोटी रुपयांच्या विक्रमी कराराची ऑफर दिल्याचे समजते आहे. या करारावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. मेस्सीने (Lionel Messi) सौदीचा प्रवास याच कारणास्तव केला असून तो येत्या काही महिन्यात फ्रेंच क्लब पीएसजी सोडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
मेस्सीचा (Lionel Messi) कट्टर प्रतिस्पर्धी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियातील अल नासर या क्लबकडून खेळत आहे. त्याने गेल्याच वर्षाच्या अखेरीस सौदी क्लबसोबत 200 दशलक्ष युरो म्हणजेच 1751 कोटी रुपयांचा करार केला आहे. मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि जुव्हेंटस येथे प्रभावी कामगिरी केल्यानंतर, तो आता सौदी अरेबियामध्ये आपल्या खेळाची जादू दाखवत आहे. जर मेस्सीने सौदी फुटबॉल क्लबसोबत करार केला तर तो रोनाल्डोला मागे टाकेल.