संजय मांजरेकर म्हणाले, अश्‍विनला संघात कधीही निवडले नसते | पुढारी

संजय मांजरेकर म्हणाले, अश्‍विनला संघात कधीही निवडले नसते

शारजाह ; वृत्तसंस्था : 2 चेंडूंत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने रविचंद्रन अश्‍विनच्या चेंडूवर षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून देत अंतिम फेरीत पोहोचवले. त्यानंतर आर. अश्‍विनवर काहींनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अश्‍विनसारख्या माणसाला संघात अजिबात स्थान देणार नाही, असे रोखठोक मत मुंबईकर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्‍त केले आहे.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीच्या संघावर 3 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा प्रवास पराभवासह संपुष्टात आला. तर, कोलकाताने चेन्‍नईविरुद्ध फायनलचे तिकीट मिळवले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या. कोलकाताने हे आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केले. सामन्यात अश्‍विनने शेवटचे षटक टाकताना दोन बळी टिपले; पण एका चुकीच्या चेंडूवर षटकार खात त्याच्या संघाला पराभूत व्हावे लागले.

संजय मांजरेकर म्हणाले की, अश्‍विनबद्दल आपण गेली अनेक वर्षे चर्चा करीत आहोत. अश्‍विन टी-20 मध्ये फासरा प्रभावी गोलंदाज नाही हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही अश्‍विनला काही सल्ला दिलात तरी तो बदलणार नाही.

कारण, गेल्या 5-7 वर्षांत तो त्याच त्याच गोष्टी करताना दिसत आहे. कसोटी सामन्यांमध्ये अश्‍विनवर अवलंबून राहणे समजू शकतो; पण टी-20 क्रिकेटमध्ये अश्‍विन हा फारसा चांगला पर्याय नाही. गेल्या पाच वर्षांत अश्‍विन एकसारखीच गोलंदाजी करताना दिसतोय.

त्यामुळे मला जर फिरकीला मदत करणारे पिच मिळाले तर मी वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण किंवा युजवेंद्र चहलला संघात घेईन; पण  अश्‍विन सारख्या माणसाला संघात अजिबात घेणार नाही, असे मांजरेकर म्हणाले.

Back to top button