अतिक्रिकेटमुळे रोहितला थकवा, कामगिरीत सातत्य नाही : शेन वॉटसन | पुढारी

अतिक्रिकेटमुळे रोहितला थकवा, कामगिरीत सातत्य नाही : शेन वॉटसन

चेन्नई : अतिक्रिकेटमुळे कर्णधार रोहित शर्मा थकला असून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनने व्यक्त केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. संघाने 7 सामने खेळताना केवळ 3 जिंकले आहेत, तर 4 सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या मोसमातही खराब कामगिरीमुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते.

वॉटसनच्या मते, गेल्या 4-5 वर्षांत रोहितमध्ये सातत्य राहिलेले नाही. शेन वॉटसनने रोहितच्या जास्त सामने खेळवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, तो म्हणाला, स्वतःला मानसिकरीत्या हाताळणे खूप कठीण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भरपूर क्रिकेट खेळतात, पण भारतीय क्रिकेटपटू वर्षभर न थांबता क्रिकेट खेळतात. रोहित टीम इंडियाचा कर्णधार आहे. म्हणूनच तो अजूनच जास्त खेळतोय. रोहित थकलेला दिसत असेल तर त्याचे कारण स्पष्टपणे कळते.

शेन वॉटसन म्हणाला, आयपीएलच्या गेल्या 4-5 हंगामांत रोहितच्या फॉर्ममध्ये सातत्य दिसलेले नाही. तो एक स्फोटक फलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध अनेक परिस्थितीत खेळला आहे. यासाठी खूप मेहनत करावी लागते.विशेष म्हणजे रोहित शर्माने या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 181 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रोहितने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 65 आहे. 2023 च्या हंगामात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्याने 14 सामन्यात 268 धावा केल्या होत्या.

Back to top button