

मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC Final) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला आहे. हा अंतिम सामना 7 ते 11 जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी बीसीसीआयने एक रणनीती आखली असून 3 युवा खेळाडू संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत.
ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान आणि इशान किशन राखीव खेळाडू म्हणून संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत. सर्फराज आणि ऋतुराज अतिरिक्त फलंदाज म्हणून तर किशन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघासोबत असेल. याशिवाय मुकेश कुमार आणि नवदीप सैनी या अतिरिक्त गोलंदाजांनादेखील बीसीसीआयने राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे. (WTC Final)
लोकेश राहुल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23-24 मे च्या सुमारास लंडनला रवाना होईल. तर काही खेळाडूही द्रविड यांच्यासोबत जातील कारण त्यांची आयपीएल मोहीम संपलेली असेल. जर मुंबई इंडियन्स, आरसीबी संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले नाहीत तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे लगेच लंडनला रवाना होतील, असे बीसीसीआयच्या अधिकार्याने इनसाईड स्पोर्टला सांगितले.