

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला त्यांच्याच घराच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. बेंगलोर संघाच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून आरसीबीला 20 षटकात 8 गडी गमावून 179 धावाच करता आल्या. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला असला तरी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात विशेष कामगिरी केली.
कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात 37 चेंडूत 54 धावा फटकावल्या. यासह त्याने या हंगामात 333 धावांपर्यंत मजल मारली आहे. या मोसमात 300 चा आकडा पार करताच कोहलीने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. सलग 14 व्या हंगामात 300 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कोहली आता एकमेव फलंदाज ठरला आहे. या यादीत कोहलीनंतर सुरेश रैना आणि शिखर धवनचा क्रमांक लागतो. या दोन्ही फलंदाजांनी सलग 12 हंगामात 300 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून कोहली खेळत आहे आणि पहिल्या दोन मोसमात त्याला 300 धावांचा टप्पा गाठता आला नाही, मात्र पुढच्या सलग 14 हंगामात त्याने दरवेळी 300 धावांचा टप्पा गाठण्याची किमया केली.
2023 : 8 डाव*, 333 धावा*
2022 : 16 डाव, 341 धावा
2021 : 15 डाव, 405 धावा
2020 : 15 डाव, 466 धावा
2019 : 14 डाव, 464 धावा
2018 : 14 डाव, 530 धावा
2017 : 10 डाव, 308 धावा
2016 : 16 डाव, 973 धावा
2015 : 16 डाव, 505 धावा
2014 : 14 डाव, 359 धावा
2013 : 16 डाव, 634 धावा
2012 : 15 डाव, 364 धावा
2011 : 16 डाव, 557 धावा
2010 : 13 डाव, 307 धावा
2009 : 13 डाव, 246 धावा
2008 : 12 डाव, 165 धावा