RCBच्या पराभवानंतर कार्तिकच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद | पुढारी

RCBच्या पराभवानंतर कार्तिकच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या लढतीत केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी धुव्वा उडवला होता. तर बुधवारी (दि. 27) दुस-या सामन्यात शाहरुख खानच्या संघाने विराट कोहलीच्या संघावर 21 धावांनी मात केली. आरसीबीच्या या पराभवात दिनेश कार्तिक व्हिलन ठरला आहे.

खरंतर कार्तिकचे काम फिनिशिंगचे आहे. मात्र काही काळापासून तो त्याच्या भूमिकेला साजेशी खेळी साकारू शकलेला नाही. 2022 च्या टी-20 विश्वचषकातही तो अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट गमावताना दिसला. आयपीएल 2023 मध्येही हेच घडत आहे. अशातच आता त्याने आपल्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे.

केकेआर विरुद्धच्या सामन्यात कार्तिकला मोठी खेळी करण्याची संधी मिळाली होती. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा आरसीबीला 51 चेंडूत 6 विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी 88 धावांची गरज होती. असे असूनही तो संघासाठी फिनिशरची भूमिका वठवू शकला नाही. 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत तो क्रीजवर होता. पण 18 चेंडूत त्याला केवळ 22 धावा करता आल्या. या संथ खेळीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

गेल्या दोन सामन्यांत तो तीन रनआऊटचा भाग झाला आहे. यासह तो आता आयपीएलमध्ये सर्वाधिक रनआऊटचा भाग होणारा खेळाडू बनला आहे. गेल्या सामन्यापर्यंत रोहित शर्मा अव्वल स्थानावर होता पण आता कार्तिक या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

IPL मध्ये सर्वाधिक रनआऊटचा भाग बनलेले खेळाडू

39 – दिनेश कार्तिक
37 – रोहित शर्मा
35 – एमएस धोनी
30 – रॉबिन उथप्पा
30 – सुरेश रैना

कार्तिक मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुयश प्रभुदेसाई आणि वानिंदू हसरंगा यांच्या रनआऊटचा भाग होता. केकेआरविरुद्ध सुयश प्रभुदेसाई पुन्हा रनआउट झाला. यावेळीही कार्तिकशी झालेल्या गैरसमजातून त्याला आपली विकेट गमवावी लागली. त्यामुळे प्रभुदेसाईने कार्तिकवर नाराजी व्यक्त केली.

Back to top button