IPL 2023 : हम भी है जोश मे…, युवाच नव्हे, इथे बुजुर्गही झोडपताहेत! | पुढारी

IPL 2023 : हम भी है जोश मे..., युवाच नव्हे, इथे बुजुर्गही झोडपताहेत!

नवी दिल्ली : टी-20 क्रिकेट ही युवा खेळाडूंची मक्तेदारी मानली जाते आणि त्यात बर्‍याच अंशी तथ्यही आहे. हॅरी बू्रक, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, बी. साई सुदर्शन, मयंक मार्कंडेय व आयुष बदोनीसारख्या युवा खेळाडूंनी आतापर्यंत या हंगामात आपला जोरदार ठसा उमटवला आहे. अर्थात, याचवेळी काही बुजूर्ग खेळाडू देखील आहेत, जे विविध आघाड्यांवर तोडीस तोड योगदान देत आहेत. अशाच बुजूर्ग खेळाडूंच्या या हंगामातील योगदानाची ही छोटीशी झलक. (IPL 2023)

महेंद्रसिंग धोनी (41 वर्षे)

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी या आयपीएल हंगामात खेळणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू. आजवर चेन्नईला चार वेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणार्‍या धोनीला या हंगामात अद्याप इतके लक्षवेधी यश मिळालेले नाही. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांत त्याने जेमतेम 61 धावा केल्या. मात्र, त्याचे कल्पक नेतृत्व हे चेन्नईसाठी सर्वात महत्त्वाचे असून याच बळावर त्यांना यंदाही जेतेपदाची अपेक्षा आहे. या हंगामात धोनीने राजस्थानविरुद्ध नाबाद 32 धावांची शानदार खेळी साकारली होती. (IPL 2023)

सामने : 7 धावा : 61 सर्वोच्च : 32 स्ट्राईकरेट : 190.97

अमित मिश्रा (40 वर्षे)

लेगस्पिनर अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज. यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सतर्फे खेळत असणारा मिश्रा आताही प्रभावी गोलंदाजी करत आला आहे. या अनुभवी फिरकीपटूने हैदराबादविरुद्ध 2 बळी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.

सामने : 4 बळी : 4 सरासरी : 16.25 इकॉनॉमी : 6.50 सर्वोत्तम : 2-23

फाफ डू प्लेसिस (38 वर्षे)

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या आणि दक्षिण आफ्रिकन संघातर्फे बर्‍याच कालावधीपासून एकही मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना न खेळलेल्या 38 वर्षीय फाफ डू प्लेसिसने या आयपीएल हंगामातही तोडफोड फलंदाजीवर चांगलाच भर दिला आहे. मागील हंगामातील लिलावात आरसीबीने या दिग्गज खेळाडूला आपल्या संघात घेतले आणि विराटऐवजी त्याच्याकडे नेतृत्वाची सूत्रेही सोपवली. यंदाच्या हंगामात प्लेसिस अतिशय धडाकेबाज बहरात असून आतापर्यंत त्याने 5 अर्धशतके फटकावली आहेत. यादरम्यान त्याने तब्बल 405 धावांची आतषबाजी केली असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही तोच आघाडीवर आहे.

सामने : 7 धावा : 405 सर्वोत्तम : 84 सरासरी : 67.50 स्ट्राईक रेट : 165.30 अर्धशतके : 5 चौकार : 33 षटकार  : 25

शिखर धवन (37 वर्षे)

पंजाब किंग्जचा कर्णधार व शैलीदार डावखुरा फलंदाज शिखर धवन या हंगामात प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अगदी तुटून पडत असल्याचे चित्र आहे. या दिग्गज फलंदाजाने राजस्थानविरुद्ध 86 तर हैदराबादविरुद्ध 99 धावांची आतषबाजी करत भारतीय संघाचे दरवाजे देखील ठोठावले आहेत. या सत्रात 200 पेक्षा अधिक धावा जमवणारा हा फलंदाज लवकरच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आव्हान प्रस्थापित करण्याची क्षमता राखून आहे.

सामने : 4 धावा : 233 सर्वोच्च : 99 सरासरी : 116.50 स्ट्राईक रेट : 146.54 अर्धशतके : 2 चौकार : 29 षटकार : 8

डेव्हिड वॉर्नर (36 वर्षे)

आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी अगदीच निराशा पडत आली असली तरी या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट मात्र चांगलीच तळपत राहिली आहे. वॉर्नरने आतापर्यंत 6 सामन्यांत 4 अर्धशतके फटकावली असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील असणार आहे. वॉर्नर आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असून त्याच्या खात्यावर 162 सामन्यांत 6 हजारपेक्षाही अधिक धावा नोंद आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त चार फलंदाजच 6 हजारपेक्षा अधिक धावांचा टप्पा पार करू शकले आहेत.

सामने : 6 धावा : 285 सर्वोच्च : 65 सरासरी : 47.50 स्ट्राईक रेट : 120.76 अर्धशतके : 4 चौकार : 42 षटकार : 0

हेही वाचा; 

Back to top button