ब्रायन लारा म्हणाला, मी कोहलीला कॅप्टन्सी सोडूच दिली नसती - पुढारी

ब्रायन लारा म्हणाला, मी कोहलीला कॅप्टन्सी सोडूच दिली नसती

नवी दिल्ली : आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा आता संघाची कॅप्टन्सी सोडणार हे नक्की झाले आहे. परंतु, वेस्ट इंडिजचा दिग्गज कर्णधार ब्रायन लारा याला मात्र आरसीबीने कोहलीला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असे वाटते आहे. ‘जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ माझ्या मालकीचा असता तर मी कोहलीला कॅप्टन्सी सोडूच दिली नसती,’ असे लाराने म्हटले आहे. आरसीबीच्या पराभवानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

काहीजण विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत असताना वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने कोहलीच्या बाजूने किल्ला लढवला आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ माझ्या मालकीचा असता तर मी कोहलीला कॅप्टन्सी सोडूच दिली नसती. कोहलीला निर्णय बदलण्यास भाग पाडले असते, असे लाराने म्हटले आहे.

क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रायन लाराने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले आहे. ‘आरसीबी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय हा विराटचा वैयक्तिक आहे. जर मी त्या फ्रेंचाईझी संघाचा मालक असतो तर त्याचे मन परिवर्तन करून त्याला संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवले असते,’ असेही ब्रायन लारा यावेळी म्हणाला आहे.

राहुल होणार आरसीबीचा कर्णधार?

नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा कर्णधार आणि ‘आयपीएल- 2021’मध्ये सर्वाधिक धावा करणारा लोकेश राहुल हा पंजाब किंग्जची साथ सोडण्यास इच्छुक असल्याचे वृत्त समोर आले आहे, तसे झाले तर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आपल्या पूर्वीच्या संघात सहभागी होण्याची दाट शक्यता असून, तोच विराट कोहलीचा कर्णधार पदाचा वारसदार असल्याचे बोलले जात आहे. ‘आयपीएल-2021’चा दुसरा टप्पा सुरू होण्या आधीच विराटने कर्णधार म्हणून ही अखेरची आयपीएल स्पर्धा असल्याचे स्पष्ट केले होते.

आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले अन् दुसरीकडे पंजाब किंग्जचा तगडा फलंदाज पुढील पर्वात संघाची साथ सोडण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आले. त्यामुळे विराटनंतर पंजाब किंग्जचा हा फलंदाज आरसीबीचे नेतृत्व सांभाळेल, असा अंदाज बांधला जात आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार अनेक फ्रँचाईझींनी लोकेश राहुलशी संपर्क साधला आहे.

पुढील पर्वात दोन नवे संघ सहभागी होणार असले तरी बीसीसीआयने अद्याप ‘रिटेन पॉलिसी’ जाहीर केलेली नाही. त्यामुळे किती खेळाडूंना ‘रिटेन’ केले जाईल आणि ‘राईट टू मॅच कार्ड’चा कसा वापर करता येईल, याबाबत संदिग्धता आहे.

Back to top button