SuryaKumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या 'नंबर वन' स्थानाला धोका! | पुढारी

SuryaKumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या 'नंबर वन' स्थानाला धोका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings SuryaKumar Yadav : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण गेल्या काही सामन्यात त्याची बॅट चालली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. त्यानंतर आयपीएल तो चमकदार कामगिरी करू शकलेला नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्याने (SuryaKumar Yadav) मुंबई इंडियन्स संघाकडून पाच सामने खेळले असून यापैकी त्याला केवळ दोनच सामन्यांत दुहेरी आकडा पार करता आला आहे. त्याची कामगिरी फ्लॉप ठरली आहे. दरम्यान, आता सूर्याचे आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान धोक्यात आल्याचे दिसत आहे.

सूर्यकुमार आयसीसी क्रमवारीत 906 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा क्रमांक आहे. त्याच्या खात्यात 798 रेटिंग आहेत. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 769 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या दोन खेळाडूंपासून सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) धोका आहे. क्रमांक एक आणि दोनमध्ये मोठी तफावत असली तरी ती भरून काढता येते. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम ज्या प्रकारचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे मोठे काम नाही. विशेष म्हणजे टीम इंडिया पुढील एक महिना कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाहीय. त्यामुळे सूर्यकुमार यादवही मैदानात दिसणार नाही.

सध्या आयपीएल सुरू आहे आणि त्यानंतर जूनमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. पण इथे गोष्ट टी-20 क्रमवारीची आहे. पाकचा संघ न्यूझीलंडकडून टी-20 मालिका खेळत आहे आणि या दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे.

पहिल्या सामन्यात मोहम्मद रिझवानने आठ आणि बाबर आझमने नऊ धावा केल्या. यानंतरही पाकिस्तानी संघाने हा सामना 88 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात मोहम्मद रिझवानने 50 धावा केल्या आणि कर्णधार बाबरने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. हा सामनाही त्यांनी 38 धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात दोघे फ्लॉप झाले. रिझवानच्या बॅटमधून सहा आणि बाबरच्या बॅटमधून फक्त एक धाव आली. यामुळेच पाकिस्तानी संघ हा सामना चार धावांच्या किरकोळ फरकाने हरला.

20 आणि 24 एप्रिल रोजी होणाऱ्या या मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. यात या दोघांनी फलंदाजी केली तर क्रमांक एक आणि दोनमधील लक्षणीय अंतर आणखी कमी होईल आणि त्यानंतर सूर्यकुमारच्या खुर्चीला धोका आणखी वाढू शकतो.

Back to top button