गरीब क्रिकेटपटूंना रिंकू सिंगचा मदतीचा हात | पुढारी

गरीब क्रिकेटपटूंना रिंकू सिंगचा मदतीचा हात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामात एक नवा स्टार खेळाडू मिळाला आहे. या स्टारचे नाव आहे रिंकू सिंग! रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज असताना सलग 5 षटकार मारत केकेआरला सामना जिंकून दिला होता. यानंतर सर्वत्र रिंकू सिंगची चर्चा सुरू झाली. यावेळी रिंकू सिंग कसा गरिबीतून वर येत आयपीएलसारख्या जागतिक दर्जाच्या लीगमध्ये धडाकेबाज कामगिरी करतोय, अशा बातम्या येऊ लागल्या.

रिंकू सिंगचे वडील हे एलपीजी सिलिंडर घरपोच करण्याचे काम करत होते. रिंकूची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पोटाची खळगी भरण्यासाठी रिंकूने झाडूदेखील मारला होता. मात्र, त्याने आपले क्रिकेटचे स्वप्न कधी मरू दिले नाही. याच स्वप्नाच्या जोरावर आज रिंकू सिंग जगप्रसिद्ध झाला.

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता रिंकू सिंगने आपल्याला सामाजिक भानदेखील असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने आपल्यासारख्याच गरिबीच्या गर्तेत अडकलेल्या क्रिकेटपटूंना मदतीचा हात देण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. रिंकू सिंगने अलीगडमध्ये एक होस्टेल उभारण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये दिले आहेत. या होस्टेलमध्ये गरीब क्रिकेटपटूंची अत्यंत कमी खर्चात सोय होणार आहे.

हे होस्टेल अलीगड क्रिकेट स्कूलच्या जागेवर उभारण्यात येणार आहे. ही 15 एकरची जागा जिल्हा क्रिकेट असोसिएशनची आहे. या होस्टेलमुळे क्रिकेटपटूंचा येण्या-जाण्याचा वेळ वाचणार आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, त्याला तरुण खेळाडूंसाठी एक होस्टेल बांधण्याची इच्छा होती. ज्यांची आर्थिक कुवत नाही त्यांनादेखील आपली स्वप्ने पूर्ण करता यावीत, यासाठी होस्टेल बांधायचे होते. आता रिंकू सिंग आर्थिकद़ृष्ट्या सक्षम झाला आहे. त्यानंतर आता तो आपले होस्टेलचे स्वप्न साकारण्यासाठी सरसावला आहे.

ही माहिती रिंकू सिंगचे लहानपणीचे प्रशिक्षक मसूद जाफर अमिनी यांनी दिली. प्रशिक्षक पुढे म्हणाले की, हे होस्टेल पुढच्या महिन्यापासून कार्यान्वित होईल. रिंकू मैदानावर चाहत्यांना प्रभावित करत आहेच. त्याचबरोबर त्याची मैदानाबाहेरील कृतीदेखील सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरली आहे.

Back to top button