घरच्या मैदानावर लीडस्चा लिव्हरपूलकडून धुव्वा | पुढारी

घरच्या मैदानावर लीडस्चा लिव्हरपूलकडून धुव्वा

लीडस्, वृत्तसंस्था : दिएगो जोटा व मोहम्मद सलाह यांनी प्रत्येकी दोन गोल केल्यानंतर लिव्हरपूलने घरच्या मैदानावर खेळणार्‍या लीडस् युनायटेड संघाचा प्रीमियर लीग स्पर्धेत 6-1 असा धुव्वा उडवला. या सामन्यात लिव्हरपूलतर्फे गॅकपोने 35 व्या, सलाहने 39 व 64 व्या, दिएगोने 52 व 73 व्या, तर नुनेझने 90 व्या मिनिटाला गोल केले. लीडस्चा एकमेव गोल सिनिस्टेराने 47 व्या मिनिटाला केला.

या वर्षभरात दिएगोने गोलजाळ्याचा अचूक वेध घेण्याची ही पहिलीच वेळ होती. याशिवाय, लिव्हरपूलतर्फे कॉडी गॅकपो व डार्विन नुनेझ यांनी प्रत्येकी एक गोल करत या विजयात मोलाचा वाटा उचलला.

लिव्हरपूलच्या खात्यावर आता 30 सामन्यांत 47 गुण असून, ते न्यू कॅसल युनायटेडपेक्षा 9 गुणांनी पिछाडीवर आहेत. लीडस् संघाला पहिल्या सत्रात गोल नोंदवण्याची अनेकदा संधी आली. मात्र, मागील लढतीत क्रिस्टल पॅलेसविरुद्ध 1-5 असा घरच्या मैदानावर दारुण पराभव पचवावा लागल्यानंतर ते यातून अजिबात सावरलेले नाहीत, असे या लढतीत दिसून आले. लीडस् संघाने सामन्यातील दोन्ही सत्रांत अतिशय बचावात्मक पवित्र्यावर भर दिला आणि याचाच त्यांना मोठा फटका बसला. लीडस्तर्फे एकमेव गोल विंगर लुईस सिनिस्टेराने केला. इतका अपवाद वगळता या सामन्यावर पूर्णपणे लिव्हरपूलचे वर्चस्व राहिले.

आमच्यासाठी आजचा सामना अतिशय खास स्वरूपाचा होता. बॉल पझेशनच्या आघाडीवर आम्ही हुकूमत गाजवली आणि यामुळे सामन्यात सहज बाजी मारता आली, असे दिएगो जोटा या लढतीनंतर म्हणाला.

या सामन्यात 2 गोल नोंदवणार्‍या सलाहच्या खात्यावर आता लीडस्विरुद्ध 6 लीग सामन्यांत 9 गोल झाले आहेत. त्याने आता गॉर्डन हॉजसनच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सर्व स्पर्धा प्रकारात त्याच्या खात्यावर हंगामात 26 गोल नोंद आहेत. सोमवारी झालेल्या लढतीत गॅकपोने 35 व्या मिनिटाला केलेला लिव्हरपूलचा पहिला गोल बराच वादग्रस्त ठरला. लीडस्ने त्यावेळी ट्रेंट अलेक्झांडर-अरनॉल्डकडून हाताला स्पर्श झाल्याचा दावा केला होता; पण अरनॉल्डने स्वत: गोल केला नसल्याने व्हिडीओ असिस्टंट रेफ्रींनी यात हस्तक्षेप केला नाही.

लिव्हरपूलसाठी सर्व प्रकारात हा 6 सामन्यांतील पहिला विजय ठरला असून, त्यांचा हा हंगामात आपल्या मैदानाबाहेरील चौथा विजय ठरला आहे. सलाहने या लढतीत एकापेक्षा एक अशी जोरदार आक्रमणे केली. अरनॉल्डच्या हाताला स्पर्श झाला असला, तरी खेळ तसाच सुरू ठेवण्यात आला आणि याचा लाभ घेत सलाहने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला.

पुढे जोटाने वेस्टन मॅकेनीला चकवा दिला आणि सलाहने काऊंटर अ‍ॅटॅकवर आपला दुसरा गोल नोंदवला. दिएगो जोटाने संघाची दोन गोलची आघाडी आणखी मजबूत करताना कर्टिन जोन्सच्या अप्रतिम पासवर त्याने गोलरक्षक मेल्सियरला चकवा देत गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला होता.

Back to top button