SRH vs MI : हैदराबाद-मुंबई यांच्यात आज रंगणार जुगलबंदी | पुढारी

SRH vs MI : हैदराबाद-मुंबई यांच्यात आज रंगणार जुगलबंदी

हैदराबाद, वृत्तसंस्था : सूर्यकुमार यादव बहरात परतल्याने मनोबल उंचावलेला मुंबई इंडियन्सचा संघ आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल (SRH vs MI) साखळी सामन्यात आमनेसामने भिडेल, त्यावेळी उभय संघात जोरदार जुगलबंदी अपेक्षित असणार आहे. मुंबई व हैदराबाद या दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले असल्याने त्यांना विजयाचा विश्वास असणे साहजिक आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही संघांना या हंगामाच्या प्रारंभी लागोपाठ पराभव पत्करावे लागले आहेत.

यापूर्वी रविवारी सूर्यकुमार यादवने आपली खराब कामगिरीची मालिका खंडित करत 25 चेंडूंत जलद 43 धावा फटकावल्या आणि या बळावर मुंबईने 186 धावांचे आव्हान 14 चेंडू राखून पार केले. मुंबईतच झालेल्या त्या लढतीत त्यांनी केकेआरवर 5 गडी राखून सहज मात केली. एकीकडे, सूर्यकुमार यादव बहरात असताना दुसरीकडे, सहकारी सलामीवीर इशान किशनने देखील 25 चेंडूंत 58 धावांची आतषबाजी करत आपली उपयुक्तता दाखवून दिली.

मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या दोन सामन्यांत जरूर झगडला. पण, आता तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिडसारखे खेळाडू समयोचित उत्तम योगदान देत असताना हा संघ समतोल भासत आहे. गोलंदाजीत पीयुष चावलाने अनुभव पणाला लावला असून युवा ऋतिक शोकिनने उत्तम साथ दिली आहे. अर्थात, या संघाला जोफ्रा आर्चरची उणीव प्रकर्षाने जाणवेल, असे स्पष्ट संकेत आहेत. त्याच्या गैरहजेरीत रिले मेरेडिथवर अधिक जबाबदारी असेल. मुंबईने यापूर्वी रविवारी अर्जुन तेंडुलकर व ड्युआन जान्सन यांना आयपीएल पदार्पणाची संधी दिली होती. या दोघांचे संघातील स्थान ‘जैसे थे’ ठेवले जाणार का, हे नाणेफेकीवेळी निश्चित होईल. (SRH vs MI)

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबाद संघाला हॅरी बु्रक व अभिषेक त्रिपाठी असे दोन नवे हिरो गवसले असून त्यांच्या बळावर सनरायजर्सने मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. बु्रकने केकेआरविरुद्ध 55 चेंडूंत 100 धावांची आतषबाजी केली तर त्रिपाठीने पंजाबविरुद्ध 48 चेंडूंत 74 धावा फटकावत संघाला मोलाचा विजय मिळवून दिला. कर्णधार एडन मारक्रमने मागील दोन सामन्यांत अनुक्रमे 50 व 37 धावांचे योगदान दिले. त्या तुलनेत मयंक अग्रवालला मात्र अद्याप सूर सापडलेला नाही. गोलंदाजांमध्ये मयंक मार्कंडे हा हैदराबादचा सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला असून त्याच्या खात्यावर 6 बळी नोंद आहेत. उमरान मलिक, मार्को जान्सन व भुवनेश्वर कुमार यांनीही प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण राखले आहे. ड्युआन जान्सन व मार्को जान्सन यांना त्यांच्या संघांनी निवडले तर ही लढत जान्सन विरुद्ध जान्सन अशीही रंगू शकते.

Back to top button