IPL 2023 : आयपीएलच्या 17 दिवसांत 26 खेळाडूंचे पदार्पण! | पुढारी

IPL 2023 : आयपीएलच्या 17 दिवसांत 26 खेळाडूंचे पदार्पण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वच संघांनी नवीन खेळाडूंवर खूप विश्वास ठेवला आहे असून त्यांना प्रदार्पणाची संधी दिली आहे. स्पर्धेच्या पहिल्या 17 दिवसांत 10 संघांच्या 26 खेळाडूंनी आयपीएल करिअरला सुरुवात केली आहे. यात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच खेळाडूंचे पदार्पण केले आहे. ज्यात सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा समावेश आहे.

आतापर्यंत स्पर्धेचा केवळ एक चतुर्थांश कालावधी उलटला आहे आणि पदार्पण करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियम याचे मुख्य कारण मानले जाऊ शकते. या नियमानुसार संघांना फलंदाजी आणि गोलंदाजीनुसार त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान एक बदल करण्याची संधी आहे. याचा अर्थ एका संघाने एका सामन्यात 12 खेळाडूंना मैदानात उतरवले असा आहे. या मोसमात आतापर्यंत खेळाडूंना दुखापत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून संघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने बदल करावे लागले आहेत. या दोन प्रमुख कारणांमुळे नव्या चेहऱ्यांना खेळण्याची संधी मिळत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज :

राजवर्धन हंगरगेकर : 2022 चा अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा वेगवान गोलंदाज हंगरगेकरला यंदा सीएसकेने संधी दिली. त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली असून तो आतापर्यंत तीन विकेट घेण्यात यशस्वी झाला आहे. पण त्याला फलंदाजीची संधी मिळालेली नाही.

सिसांडा मागाला : काइल जेमिसन जखमी झाल्यावर सीएसकेने आपल्या संघात महत्त्वाचा बदल केला. त्यांनी द. आफ्रिकेतील अष्टपैलू खेळाडू मगालाला संधी दिली. त्याने दोन सामने खेळले असून एक विकेट घेतली आहे. पण तो जखमी झाल्याने पुढील सामने खेळेल की नाही हे येणारा दिवसात स्पष्ट होईल.

दिल्ली कॅपिटल्स :

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत अभिषेक पोरेल याची यष्टीरक्षक म्हणून निवड केली. त्याने चार सामने खेळून 33 धावा केल्या आहेत. तर विकेटच्या मागे त्याने आतापर्यंत चार झेल पकडले आहेत. त्याचबरोबर दिल्ली संघाने 2022 च्या अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या यश धुलला दोन सामने खेळण्याची संधी दिली आहे. पण त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. तो आतापर्यंत दोनच धावा करू शकला आहे. दुसरीकडे मुकेश कुमार हा स्विंग बॉलर तीन सामने खेळला आहे यामध्ये त्याने चार विकेट घेतल्या असून तो दिल्लीसाठी संयुक्तरित्या सर्वोच्च स्थानी आहे.

गुजरात टायटन्स :

आयर्लंडच्या जोश लिटल या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत गुजरात संघासाठी चार सामने खेळले असून तीन बळी घेतले आहेत. अफगाणिस्तानचा स्पिनर नूर अहमदला गुजरातने राजस्थान रॉयल्सविरुद्ध इम्पॅक्ट खेळाडू म्हणून पदार्पण करण्याची दिली. त्यानेही आपले प्रदार्पण यशस्वी केले आणि एक विकेट घेतली.

कोलकाता नाईट रायडर्स :

अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज गेल्या मोसमात गुजरात टायटन्ससोबत होता पण खेळू शकला नाही. आता तो केकेआर संघाचा भाग असून यंदाच्या स्पर्धेत त्याने पदार्पण केले आहे. त्याने पाच सामने खेळले असून एका अर्धशतकासह 102 धावा केल्या फटकावल्या आहेत. दिल्लीच्या सुयश शर्मा या अनोळखी लेग-स्पिनरने आरसीबीविरुद्ध पदार्पण केले आणि तीन विकेट्स घेतल्या. तो अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये वरिष्ठ स्तरावर खेळकेला नसला तरी आयपीएलमध्ये चमक दाखवत आहे.

लखनौ सुपर जायंट्स :

वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाजा काइल मेयर्सला लखनौने सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले. पहिल्या दोन सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली. आतापर्यंत त्याने पाच सामन्यांत 168 धावा केल्या आहेत.

विदर्भाच्या यश ठाकूर या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एक विकेट घेतली आहे. तर लखनऊने जम्मू-काश्मीरमधून आलेल्या युधवीर सिंग या वेगवान गोलंदाजाला पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण करण्याची संधी दिली. त्याने दोन विकेट घेतल्या.

मुंबई इंडियन्स :

एमपीमधून आलेल्या अर्शद खान या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यात त्याने 17 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबईने 17.5 कोटींमध्ये घेतले. त्याने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि 35 धावा काढून दोन विकेट्स मिळवल्या आहेत. ड्युएन यानसन याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात त्याला एक विकेट मिळाली.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर हा अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. तो कधी आयपीएलमध्ये प्रदार्पण करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर तो दिवस उजाडला आणि 16 एप्रिल रोजी केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याला वानखेडे मैदानात प्रदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने दोन षटके टाकली पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. पंजाबच्या नेहल वढेरा या फलंदाजाचे पदार्पणही याच हंगामात झाले. त्याने तीन सामने खेळले असून 27 धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्स

लेगस्पिनर मोहित राठीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यात त्याने एक धाव काढली. पण गोलंदाजी करताना त्याला विकेट घेता आली नाही. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलचा भाग झाला. त्याने आतापर्यंत चार सामने खेळले असून एका अर्धशतकासह 79 धावा फटकावल्या आहेत. तर तो दोन बळी घेण्यात यशस्वी झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याला जॉनी बेअरस्टोच्या जागी घेण्यात आले. तो तीन सामने खेळला असून 7 धावा केल्या आहेत. विदर्भचा अष्टपैलू खेळाडू अथर्व तायडे याला लखनौविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याला खातेही उघडता आले नाही.

राजस्थान रॉयल्स

2020 अंडर-19 भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या ध्रुव जुरेल या यष्टीरक्षक फलंदाजाने फिनिशर म्हणून चांगली छाप पाडली आहे. त्याने चार सामने खेळले असून 182.35 च्या स्ट्राइक रेटने 62 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलला खेळण्याची संधी मिळाली. विल जॅकच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान मिळाले आहे. तो आतापर्यंत दोन सामने खेळला आहे आणि 19 धावा करून दोन विकेट्स घेतल्या आहेत. कर्नाटकच्या विजयकुमार विशाक या वेगवान गोलंदाजाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने तीन बळी घेतले. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना खेळला. यात तो जखमी झाला आणि आता तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

सनराइज हैदराबाद

हैदराबादने हॅरी ब्रूक या इंग्लिश फलंदाजाला 13.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याने कोलकाताविरुद्ध शतक झळकावले, जे या मोसमातील पहिले शतक ठरले. त्याच्या चार सामन्यांत 129 धावा झाल्या आहेत.

Back to top button