IPL 2023 : ‘हे’ 5 ‘इम्पॅक्ट प्लेअर’ बनले ‘बाजीगर’! पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावला | पुढारी

IPL 2023 : 'हे' 5 'इम्पॅक्ट प्लेअर' बनले 'बाजीगर'! पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नव्या नियमाची अंमलबजावणी होत आहे. या नियमामुळे आयपीएलच्या 16 व्या हंगामातील अनेक सामन्यांना कलाटणी मिळाल्याचे चाहत्यांनी अनुभवले. खरंतर ‘इम्पॅक्ट’ खेळाडूंनी ‘बाजीगर’ स्टाईलमध्ये गमावलेला सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हा नियम लागू झाल्याने इम्पॅक्ट खेळाडूला नवी ओळख मिळाली आहे. अशाच 5 प्रभावशाली खेळाडूंची मॅच बाय मॅच स्टोरी पाहुया, ज्यांनी आपल्या संघाचे कमबॅक करून हरलेला सामना जिंकून दिला.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ व्यंकटेश अय्यरने विजयाचा पाया भक्कम केला

अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 13 वा सामना झाला. या सामन्यात रिंकू सिंगने पाच चेंडूत 5 षटकार ठोकत इतिहास रचला आणि केकेआरला (KKR) विजय मिळवून दिला, पण या सामन्यात कोलकाताचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) विजयाचा पाया भक्कम केला. त्याने 40 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. याआधी या सामन्यात गुजरात टायटन्सने 204 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने शेवटच्या चेंडूवर रिंकूच्या पाच ऐतिहासिक षटकारांच्या जोरावर धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला.

शेवटच्या चेंडूवर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ने घेतल्या दोन विजयी धावा

सध्याच्या आयपीएलचा 16 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सतर्फे दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. मुंबईने शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यातही ‘इम्पॅक्ट’ खेळाडूची भूमिका महत्त्वाची राहील.

19 व्या षटकात, मुंबई इंडियन्सचा ‘इम्पॅक्ट’ खेळाडू टीम डेव्हिडने कॅमेरून ग्रीनसह मुस्तफिझूर रहमानला दोन षटकार ठोकले आणि एकूण 15 धावा वसूल केल्या. यानंतर शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज होती. पाच चेंडूत तीन धावा काढण्यात मुंबईच्या फलंदाजांना यश आले. नंतर शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ‘इम्पॅक्ट’ खेळाडू टीम डेव्हिड 2 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

अंबाती रायडूने चेन्नईला विजयी केले

आयपीएलचा 12 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 18.1 षटकात 7 गडी राखून सामना जिंकला. चेन्नईला हा सामना जिंकून देण्यात इम्पॅक्ट खेळाडू अंबाती रायडूने मोलाची कामगिरी केली. त्याने मुंबईविरुद्ध 16 चेंडूत 20 धावा (नाबाद) केल्या, ज्या चेन्नईच्या विजयासाठी खूप त महत्त्वाच्या ठरल्या.

19 वर्षीय इम्पॅक्ट खेळाडूने 3 बळी घेतले

आयपीएलच्या 9 व्या सामन्यात, केकेआरने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू सुयश शर्माचा इम्पॅक्ट म्हणून समावेश केला. सुयशने 30 धावांत 3 बळी घेऊन सामन्याला कलाटणी दिली. सुयशचा हा डेब्यू सामना होता.

पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट खेळाडूची दिसली ताकद

आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 7 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 4 चेंडूत 5 बाद 182 धावा करून विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने पहिली विकेट पडल्यानंतर साई सुदर्शनला संधी दिली. साईने 17 चेंडूत 23 धावांची खेळी खेळली. ज्याने गुजरातला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पहिल्या चेंडूवर षटकार मारला, नंतर आर्थिकदृष्ट्या गोलंदाजी केली

आयपीएल 2023 च्या 3 -या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून लखनौने कृष्णप्पा गौतमला संधी दिली. त्याने 1 चेंडूचा सामना करत 6 धावा केल्या. नंतर गोलंदाजी करताना त्याने 4 षटकात 23 धावा दिल्या. या सामन्यात लखनौने प्रथम खेळताना 6 बाद 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 9 बाद 143 धावांवर गारद झाला. या सामन्यातही इम्पॅक्ट खेळाडूची भूमिका स्पष्टपणे दिसून आली.

जेव्हा इम्पॅक्ट खेळाडूने सामना जिंकून दिला

आयपीएलच्या सातव्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय शंकरला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. त्याने 23 चेंडूत 29 धावा केल्या. या सामन्यात गुजरातने 11 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून विजय मिळवला.

पराभवानंतरही इम्पॅक्ट खेळाडू ठरले ‘हिरो’

आयपीएलचा सहा क्रमांकाचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई यांच्यात झाला. चेन्नईने प्रथम खेळताना 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 205 धावाच करू शकला. या सामन्यात लखनौने प्रभावशाली खेळाडू म्हणून आयुष बडोनीला संधी दिली. सातव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या या 23 वर्षीय खेळाडूने 18 चेंडूत 23 धावा केल्या. लखनौने हा सामना गमावला. पण बदोनीने केलेली खेळी सर्वांच्या लक्षात राहिली. चेन्नईने हा सामना 12 धावांनी जिंकला. तर, सामना क्रमांक 8 भलेही राजस्थानने 5 धावांच्या किंचित फरकाने गमावला असला तरी इम्पॅक्ट खेळाडूची ताकद काय असते हे 21 वर्षीय ध्रुव जुरेलने सिद्ध केले. त्याने 15 चेंडूत 32 धावा फटकावल्या.

इम्पॅक्ट प्लेअर नियम काय आहे?

आयपीएल 2023 मध्ये क्रिकेटला रंजक बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे ‘रूल ऑफ इम्पॅक्ट प्लेअर’. या नियमानुसार, कोणताही संघ परिस्थितीनुसार इउम्पॅक्ट खेळाडूचा समावेश करू शकतो.

‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमानुसार, दोन्ही संघांना प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त 5-5 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या पाचपैकी एकाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले जाते. हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. इम्पॅक्ट प्लेअरने गेममध्ये प्रवेश केल्यानंतर जो खेळाडू बाहेर जातो त्याला पुन्हा सामन्यात खेळवले जात नाही.

Back to top button