Rohit Sharma : रोहित शर्माची कमाल; विराटला मागे टाकत केला IPL मध्ये मोठा विक्रम | पुढारी

Rohit Sharma : रोहित शर्माची कमाल; विराटला मागे टाकत केला IPL मध्ये मोठा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. रोहितने ४५ चेंडूत ६५ धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. रोहितचे आयपीएलमधील हे ४१ वे अर्धशतक आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावताच विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला. रोहित दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर होती. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध ९२५ धावा केल्या आहेत. तर रोहित ९७७ धावा करून पहिल्या क्रमांकावर आला आहे. रहाणे ७९२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा

रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स) – ९७७ धावा

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – ९२५ धावा

रहाणे (DKKR, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग सुपरजायंट्स) – ७९२ धावा

रोहितची बॅट तळपली

पहिल्या दोन पराभवांच्या झटक्यानंतर मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केले. मंगळवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेटस्नी हरवून यंदाच्या पहिल्या विजयाची नोंद केली. शेवटच्या षटकात ६ चेंडूंत ५ धावांची गरज असताना एन्रिक नोत्झेने टिच्चून मारा करीत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना लांबवला. परंतु, टीम डेव्हिडने शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत विजय मुंबईच्या नावावर केला. रोहित शर्माची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली, त्याने ४५ चेंडूंत ६५ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५१) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १९.४ षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या. पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठले.

Back to top button